Breaking News

महाडमधील जुगार अड्ड्यांवर धाड

लॉज चालकासह 14 जणांना अटक

महाड : प्रतिनिधी

कायद्याचे उल्लंघन करून एका घरात आणि नामांकित लॉजमध्ये चालविल्या जाणार्‍या जुगार अड्ड्यांवर महाड शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 11) धडक कारवाई करीत लॉज चालक आणि नगरसेवकासह 14 जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जुगार खेळणार्‍यांना धडकी भरली आहे. महाड शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. जुगार, मटका, ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली मटका, चिमनीपाखर असे अनेक अवैध जुगाराचे प्रकार राजरोस सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी आणि मध्यरात्री महाड शहर पोलिसांनी हॉटेल विसावा रिव्हरसाईड या नामांकित हॉटेल लॉज आणि  नगरसेवक गोविंद गणपत राक्षे यांच्या घरावर छापे टाकून जुगार खेळणार्‍या 14 जणांना अटक करून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नगरसेवक गोविंद राक्षे, तसेच गणेश धोंडू शिगवण, विजय नारायण मोरे, प्रदीप तुकाराम धोंडगे, मुअज्जम इसाक कापडी, संतोष लक्ष्मण भरणे, बाळाराम महिपत कदम, बिभीषण महिपत कदम, मिलिंद मधुकर शिगवण, लॉज चालक चंद्रशेखर वासु शेट्टी, उमेश प्रफुल्ल शेठ, रूपेश प्रभाकर पवार, रवींद्र वसंत इंगवले, चिनार मंगेश मांडवकर यांना महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 सह मुंबई दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) अन्वये अटक करण्यात आली. या दोन वेगवेगळ्या छाप्यामध्ये 52,255 रुपयांची रोकड, एक लाख 19 हजारांचे नऊ मोबाईल, 290 रुपये किमतीची दारू, एक इर्टीका कार (एमएच 06, बीए 6131) आणि पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक फौजदार पी. एस. कापडेकर अधिक तपास करत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply