वाढीव वीज बिलांमुळे महावितरणविरोधात संताप

उरण : वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये मार्चपासून मे महिन्या पर्यंत गेली तीन महिने सरासरीवर आधारित ऑनलाइन वीज बिले देण्यात आली. त्यानुसार बहुसंख्य ग्राहकांनी ती भरली मात्र जून महिन्यात रीडिंगनुसार वीज बिल वितरीत करताना मागील भरलेली बिलाची रक्कम ग्राह्य न धरता सरसकट तीन महिन्याच्या सरासरीनुसार एकत्रित वीज बिले देण्यात आली आहेत. हि बिले अव्वाच्या सव्वा असल्याने ग्राहकांत गोंधळाची स्थिती निर्माण आली आहे.
मार्चपासून जूनपर्यंत व मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्यांची बिले (हार्ड) कॉपीज न देता व कोरोनामुळे मीटरचे रीडिंग न घेता बिल सरासरी धरून बिले करण्यात आली. ग्राहकांनी मे महिन्यात वापरलेली वीज व त्यावरील आकारलेली बिल जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत.
या संदर्भात वीज वितरण मंडळ उरण कार्यालयात विजेची अव्वाच्या सव्वा बिलाबाबत चौकशी केली असता ग्राहकांच्या तक्रारी बद्दल समाधनकारक उत्तरे दिले जात नाहीत. त्याउलट तुम्ही विजेचा वापर केलेला आहे. त्यानुसार तुम्हाला बिलाची रक्कम आकारण्यात आली आहे, असे सांगितले जाते. तुम्हाला आलेले बिल बरोबरच आहे व ते तुम्हाला भरावेच लागेल, अशी उत्तरे दिली जातात.
आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट असताना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आल्याने ग्राहकांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भरलेली बिले वजा करून एक महिन्याचे स्वतंत्र बिल देण्याची मागणी ग्राहक करीत आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधी यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
वाढीव वीज बिलामुळे उरणमधील ग्राहक हैराण झाले आहेत. कार्यालयामध्ये तक्रारी घेऊन जात आहेत व महावितरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.