Breaking News

खा. उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

राजधानी दिल्लीत जंगी स्वागत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढे चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन मी भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला,’ असे उदयनराजे यांनी या वेळी सांगितले.

नवी दिल्लीत उदयनराजेंच्या प्रवेशाचा खास सोहळा पार पडला. भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश मंत्री, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले या सोहळ्यास उपस्थित होते.

उदयनराजे यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोंडभरून स्तुती केली. देश एकत्र, एकसंध व मजबूत कसा राहील, यासाठी मोदी व शहा हे काम करीत आहेत. त्यांच्या कामामुळे देशातील प्रत्येक राज्यात भाजपची वाढ होतेय. लोक या पक्षात येऊ इच्छित आहेत, असे उदयनराजे म्हणाले. काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. यापुढे मी मोदी, शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपमधील माझ्या सहकार्‍यांच्या साथीने समाजासाठी काम करेन, अशी ग्वाहीदेखील राजेंनी दिली.

छत्रपती शिवरायांचे वंशज भाजपमध्ये येताहेत याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही तुमचे स्वागत करतो, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या वेळी म्हणाले.

उदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते : मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे नाव ज्यांनी मोठे केले असे उदयनराज भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ही अभिमानास्पद बाब आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हाही उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ दिली होती. उदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. ते राजे जरी असले तरी लोकशाहीवर विश्वास ठेवून आहेत. जनतेत काम करीत असल्याने युवकांचे त्यांच्यावर मोठे प्रेम आहे. त्यांच्या येण्याने भाजपची ताकद वाढली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply