Breaking News

बचतगटांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील

पेण ः प्रतिनिधी

बचतगटांच्या प्रगतीसाठी व त्यांचा आर्थिक स्तर वाढावा यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले. पेण नगर परिषद व माविम यांच्या वतीने शहरातील स्थापन केलेल्या सर्व महिला बचतगटांच्या नावीन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बचतगटांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, सभापती शहेनाझ मुजावर, सभापती नलिनी पवार, सभापती अश्विनी शहा, नगरसेविका वैशाली कडू, नगरसेवक प्रशांत ओक आदींसह बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या. या वेळी स्पर्धेत प्रथम क्रमांक लुंबिनी महिला बचतगट 10,000 रु. रोख व प्रशस्तिपत्र, द्वितीय क्रमांक मैत्री महिला बचतगट व महालक्ष्मी महिला बचतगट 7,000 रु. रोख व प्रशस्तिपत्र, तृतीय क्रमांक मन्नत महिला बचतगट व सुहासिनी महिला बचतगट 5,000 रु. रोख व प्रशस्तिपत्र असे बक्षीस देण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी प्रास्ताविक करताना शासनाने महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने नावीन्यपूर्ण उद्योग संकल्पना सादर करणार्‍या बचतगटांना बक्षीस स्वरूपात आर्थिक लाभ देऊन प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी पेण नगर परिषदेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोगिता ठुबे यांनी, तर आभार प्रदर्शन राजाराम नरूटे यांनी केले.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply