बिल्डर्स असोसिएशनचे पालकमंत्र्यांना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी
माणगावमधील बांधकामे शासनाने नियमित करावीत, असेे निवेदन माणगाव बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. माणगाव येथील बांधकामाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याकामी उपविभागीय अधिकारी माणगाव यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यासोबत साधारणपणे सन 2010-11 या कालावधीकरिता एकूण 116 बांधकामांबाबतची माहिती दिली होती. या प्रतिज्ञापत्रात माणगाव नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे काढून टाकावीत, असे आदेश माणगाव नगरपंचायतीला दिले आहेत. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी, माणगाव नगरपंचायत यांनी सर्व संबंधितांस 13 ऑगस्ट रोजी नोटीस देऊन बांधकाम पाडण्याचे कळविले आहे. ही बांधकामे शासनाने नियमित करावीत यासाठी माणगाव ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देऊन चर्चा करून या गंभीर प्रश्नाकडे राजिप माजी सदस्य, माणगाव बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे, प्रदीप गांधी, माणगाव नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे यांनी माणगाव ग्रामस्थांच्या वतीने लक्ष वेधले.