महानिर्मितीला 20 कोटींचा फटका
उरण ः रामप्रहर वृत्त
उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसापासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅस पुरवठा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका वीज संचातून 115 मेगावॅट वीजनिर्मिती झाली आहे. मात्र गॅसअभावी वीजनिर्मिती गेले 10 दिवस बंद राहिल्याने या प्रकल्पाला 20 कोटींचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. महानिर्मितीचा उरण येथे गॅसवर चालणारा 672 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प आहे. हा वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी दररोज सुमारे 3.35 दशलक्ष घनमीटर गॅसची आवश्यकता असते. पण अपुर्या गॅसमुळे वर्षानुवर्षे हा वीज प्रकल्प अर्ध्य क्षमतेवर म्हणजे 250 मेगावॅट एवढ्या कमी क्षमतेवर चालत आहे. त्यातच मंगळवार 3 सप्टेंबर रोजी उरण ओएनजीसीला लागलेल्या आगीमुळे वीज प्रकल्पाला होणारा गॅस पुरवठा बंद झाला होता. तो सोमपासून काहीअंशी सुरू झाला आहे. दरम्यान, गॅसपुरवठा बंद झाल्याने 250 मेगावॅट एवढी होणारी वीजनिर्मिती बंद पडली होती. 250 मेगावॅटप्रमाणे 24 तासांत 60 लाख विजेची निर्मिती होते. तसेच येथे तयार होणार्या प्रतीयुनिट विजेचा दर तीन रुपये एवढा आहे. गेली 10 दिवस वीजनिर्मिती बंद राहिल्याने महानिर्मितीला 20 कोटींचा फटका सहन करावा लागला असल्याची माहिती प्रकल्पाच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
वीजनिर्मितीवर परिणाम होणार
ओएनजीसीकडून गॅस पुरवठा सुरू झाला असला तरी तो कोणत्या गुणवत्तेचा आहे, वजनाने जड असेल तर त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर गॅस पुरवठा सुरू झाला असला तरी तो पूर्ण क्षमतेने कधीपासून मिळणार याबाबतही कोणतीही ठोस माहिती नाही. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात गॅस येईल तेवढीच वीजनिर्मिती होणार आहे.