लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचा पुरस्काराने सन्मान
सातारा : रामप्रहर वृत्त
शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा 105वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 4) सातारा येथे साजरा झाला. या समारंभात विविध शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये यंदाचा दि.बा. पाटील उपक्रमशील शाळा हा पुरस्कार कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजला देऊन सन्मानित करण्यात आले.
कर्मवीर समाधी परिसरात संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, संघटक डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, अॅड. रवींद्र पवार, जे.के.जाधव, बाबासाहेब भोस, डॉ. एम.बी. शेख आदी मान्यवरांसह कर्मवीर कुटुंबीय उपस्थित होते.
या वेळी संस्थेच्या रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले तसेच संस्थेसाठी बहुमोल योगदान दिलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ दिले जाणारे विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या समारंभाला संस्थेचे सचिव विकास देशमुख, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव बी.एन. पवार, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, अॅड. दिलावर मुल्ला, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, डॉ. सविता मेनकुदळे, ज्योस्त्ना ठाकूर यांच्यासह स्थानिक शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, रयत सेवक, रयतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दैनंदिन शिक्षण, शिस्तीसह विविध उपक्रम राबवले गेले. याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नती व व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करण्यात आले. या विद्यालयात सर्वच बाबतीत आधुनिकता तसेच विद्यार्थ्यांची प्रगती हे ध्येय ठेवून सतत नवनवीन गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहचतील असा प्रयत्न विद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे करत असतात. त्यांनी सर्वांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दरम्यान, विद्यालयाने अशीच उत्तरोत्तर प्रगती करत जावी, अशा शब्दांत विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. या पुरस्काराबद्दल प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, पर्यवेक्षिका सारिका लांजुडकर, कुसुम प्रजापती, नेहा खन्ना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे अभिनंदन होत आहे.