Breaking News

आरसीएफचा विस्तारीत प्रकल्प थळ येथेच होणार -पालकमंत्री

अलिबाग : प्रतिनिधी
राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायझर्सचा (आरसीएफ) विस्तारीत प्रकल्प थळ येथेच होणार आहे. हा प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही. लवकरच या प्रकल्पाची जनसुनावणी घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. 15) येथे दिली.
पालकमंत्री उदय सामंत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.
आरसीएफच्या पीआर/पीएन तंत्रज्ञानावर आधारित नवीन 1200 एमटीपीडी (डीएपी आधार) एनपीके/डीएपी कॉम्प्लेक्स फर्टिलायझर प्लांट उभारण्याच्या विस्तारीत प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी  15 नोव्हेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील हॉटेल साई-इन येथे आयोजित करण्यात आली होती, परंतु स्थानिकांचा विरोध असून सुनावणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शकतो असे कारण देऊन ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, आरसीएफ प्रकल्पातील 140 प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न अजून सुटलेला नाही. हा प्रश्न प्रथम सोडवावा व नंतर विस्तारीत प्रकल्प आणावा असे स्थानिकांचे म्हणणे होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जनसुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
आरसीएफच्या 140 प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. केंद्रीय रसायनमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. 140 प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
जनसुनावणी रद्द झाल्यामुळे आरसीएफचा विस्तारीत प्रकल्प अन्य राज्यात जाऊ शकतो असे चुकीच्या माहितीवर सांगितले जात आहे. लवकरच आरसीएफच्या विस्तारीत प्रकल्पाची जनसुनावणी घेण्यात येईल. विस्तारीत प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही. हा प्रकल्प आरसीएफच्या थळ प्रकल्पाच्या परिसरातच होईल, असे ना. सामंत यांनी म्हणाले.
रायगडात भव्य रोजगार मेळावा
उद्योग विभागामार्फत 20 फेब्रुवारी 2023 रोजी रायगड जिल्ह्यात भव्य रोजगार मेळावा घेणार आहे. यात जिल्ह्यातील कंपन्यांबरोबरच देशातील तसेच परदेशातील कंपन्यांचा सहभाग असणार आहे. स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा यासाठीचे प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे  पालकमंत्री उदय सामंत यांनी या वेळी दिली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply