Breaking News

न्यायालयाने चौकशीचे आदेश देताच ठाकरे सरकार बॅकफूटवर

अखेर गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (दि. 5) अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर सचिन वाझेंना 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेअंती देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. त्यानंतर देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेसह अन्य याचिकांवर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता. त्यावर गुरुवारी न्यायालयाने निकाल दिला. जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत. त्यामुळे असामान्य स्थिती म्हणून सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले जात आहेत. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय सीबीआयने घ्यावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने 15 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेले आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.
दुसरी विकेट
याआधी शिवसेना नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. या संदर्भात ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्या होत्या. वाढत्या दबावानंतर राठोड यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रूपाने ठाकरे सरकारमधील दुसर्‍या मंत्र्याची खूर्ची गेली आहे. हाही विषय भाजपने जोरदारपणे लावून धरला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा दणका देताच ठाकरे सरकारने एक पाऊल मागे घेतले आणि देशमुखांचा राजीनामा झाला. दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार बदनाम झाले असल्याची चर्चा आहे.
देशमुखांच्या राजीनाम्यास उशीरच झाला -फडणवीस
मुंबई ः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर माध्यामांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. खरेतर राजीनामा देण्यासाठी उशीरच झाला, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर हे अपेक्षितच होते की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तशा प्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याचे माध्यामांद्वारे समोर आले आहे. खरे म्हणजे मला असे वाटते की, हा राजीनामा देण्यासाठी उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती की, इतके गंभीर आरोप झाल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तत्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व शरद पवार यांनी घ्यायला हवा होता, परंतु त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली.
‘शेवटी राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात आणि जेव्हा परिस्थिती अडचणीची असते, तेव्हा त्या परिस्थितीला सामोरे जाऊन मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचे असते की, ठीक आहे चूक झाली असेल, पण आम्ही ती सुधारू किंवा आमचे यावर असे म्हणणे आहे. अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर आल्या पाहिजे, मात्र या संपूर्ण प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे मौन हे अस्वस्थ करणारे आहे,’ असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply