Breaking News

भारताला दुहेरी धक्का

सिंधू पहिल्याच फेरीत गारद

सेऊल : वृत्तसंस्था

विश्वविजेती भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात तिला बिवेन झँग हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे भारताचा बी. साईप्रणीत याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळाव्या लागलेल्या सिंधूला अमेरिकेच्या झँग हिने 21-7, 22-24, 15-21 असे पराभूत केले. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने झँगला पराभूत केले होते. हा सामनादेखील याच महिन्यात झाला होता. झँगने बुधवारी (दि. 25) सिंधूविरुद्धच्या झालेल्या सामन्यात पराभवाचा वचपा काढला.

क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूसाठी हा सामना सुरुवातीला अत्यंत सोपा होता. पहिल्या गेममध्ये सिंधूने झँगला 21-7 असे एकतर्फी पराभूत केले, पण त्यानंतर दुसर्‍या गेममध्ये मात्र सिंधूला कडवी झुंज मिळाली आणि अखेर दोन गुणांच्या फरकाने झँगने बरोबरी साधली. दोघींनी प्रत्येकी एक गेम जिंकल्यानंतर तिसरा गेम खूपच रंगतदार होणार अशी अपेक्षा सार्‍यांना होती. त्यानुसार खेळ रंगला, पण त्यात झँग सरस ठरली. तिने सामना जिंकत पुढील फेरीत धडक मारली.

दुसरीकडे भारताचा बी. साईप्रणीत डेन्मार्कच्या अँडर्स अँटन्सन याच्या विरोधात सलामीचा सामना खेळताना ‘रिटायर्ड हर्ट’ झाला. सामन्यात साई प्रणीतने पहिला गेम 21-9 असा गमावला होता, तर दुसर्‍या गेममध्ये तो 11-7ने पिछाडीवर होता. त्याच वेळी तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला आणि त्याने स्पर्धेतून माघार घेतली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply