बंगळुरू : वृत्तसंस्था
आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी 4 बाय 100 मीटर पुरुषांच्या फ्री स्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले. भारतीय संघाने 3:23.72 सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणार्या इराणच्या संघाने 3:28.46 सेकंद अशी वेळ नोंदवली, तर तिसर्या स्थानावरील उझबेकिस्तानच्या संघाने 3:30.59 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.
भारताच्या आव्हानाला सुरुवात श्रीहरीने करताना 50.68 सेकंदांसह पहिला टप्पा पूर्ण केला. इराणचा सिना घोलमपौरला 51.42 सेकंद लागले. मग आनंदने आघाडी कायम राखताना 51.28 सेकंदांत अंतर पूर्ण केले, तर तिसर्या टप्प्यात साजनने 51.37 सेकंद अशी वेळ नोंदवली. अखेरच्या टप्प्यात वीरधवलने 50.39 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.
महिला संघाला रौप्यपदक
महिलांच्या 4 बाय 100 मीटर रीले प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रुजूता खाडे (59.83 सेकंद), दिव्या सतिजा (1:01.61 सेकंद), शिवानी कटारिया (59.57 सेकंद) आणि माना पटेल (59.75 सेकंद) यांचा भारतीय संघात समावेश होता.
मुलांच्या गट-2मध्येसुद्धा भारतीय संघाला 4 बाय 100 मीटर रीले प्रकारात रौप्यपदक मिळाले. वेदांत माधवन, उत्कर्ष पाटील, साहिल लष्कर आणि शोआन गांगुली यांचा समावेश असलेल्या संघाने 3:41.49 सेकंद अशी वेळ नोंदवली.