नागोठणे : प्रतिनिधी
अंबा नदीवरील नागोठणे पुलाची पुरांमध्ये पडझड होऊन दुरवस्था झाली असून, त्याकडे संबधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. वरवठणेतील तरुणांनी या पुलाच्या दोन्ही बाजूकडील गवत, तसेच पुराच्या पाण्यात अडकलेला सर्व कचरा साफ केला. नागोठणे शहराचे वैभव असलेले, तसेच साडेचारशे वर्षापूर्वी नागोठणे-वरवठणे आणि रोहा या गावांना जोडणार्या येथील अंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाची या वर्षी पुरांमध्ये पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. संबधित खात्याच्या अधिकार्यांनी या पुलाची पाहणी करूनही कोणतीही डागडुजी केली नाही. दरम्यान, वरवठणे येथील भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, रोहे तालुका कृषी उत्पन्न बाजार सभापती तथा ग्रा.पं. सदस्य गणपत म्हात्रे, ग्रा.पं. सदस्य गणपत ल. म्हात्रे, द्वारकानाथ भोय, प्रशांत म्हात्रे, हितेश पाटील, नितिन पाटील, नरेश पाटील, नथुराम म्हात्रे, श्रीकांत पाटील, गणेश पाटील, राकेश म्हात्रे, हर्षल ढमाल, संतोष राणे, संदीप भोय, किशोर नाईक, पांडुरंग दांडेकर, रूपेश शेडगे, विशाल म्हात्रे यांच्यासह गावातील तरुणांनी एकत्र येत पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाढलेले गवत, तसेच पुराच्या पाण्यात अडकलेला सर्व कचरा साफ केला. सदरील पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनास बंदी आहे, पर्यायी मार्गाचा वापर करावा, असा फलक काही वर्षांपूर्वी शासनाकडून पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आला आहे, मात्र या भल्यामोठ्या फलकाकडे दुर्लक्ष करीत या पुलावरून दररोज अनेक लहान-मोठी वाहने ये-जा करीत होती व त्यामुळे पूल केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. त्याची दखल या तरुणांनी घेऊन पुलाच्या दोन्ही बाजूच्या टोकाला दगडांचे कठडे रचून सदरील पुलावरून मोठी वाहतूक बंद केली आहे.