जागतिक फार्मासिस्ट डेनिमित्त कर्जतमध्ये कार्यक्रम
कर्जत : प्रतिनिधी
ऑनलाइन पद्धतीमुळे मादक औषधांचा दुरुपयोग होऊन व्यसनाधिनतेची भीती वाढली आहे, तसेच गर्भपाताचे किट उपलब्ध होऊन त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो. अशा परिस्थितीत औषधांबद्दल समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सेवानिवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी कर्जत येथे केले. जागतिक ’फार्मासिस्ट डे’निमित्ताने कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महेश झगडे बोलत होते. 1947 साली भारतीयांचे आयुर्मान सरासरी 32 वर्षे होते आता ते 69 वर्षे आहे. भारतीयांच्या आयुर्मानवाढीमागे आपल्या सर्व फार्मासिस्टचे योगदान असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे आणि सतीश पिंपरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. फार्मासिस्ट झाल्यावर रुग्णाला दैवत मानून त्याला सेवा देण्याचे व्रत अंगीकारावे, असा सल्ला प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविकात दिला. औषध उत्पादनात आपल्या देशाची प्रगती होत आहे. त्यावरून येत्या पाच वर्षांत भारतीय औषध व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना मेहनत घेणे हे प्रत्येक फार्मासिस्टचे काम आहे, असे मत फार्मसी कन्सल्टंट ब्रिज सारडा गुफिक लॅबरोट्रीजचे अध्यक्ष देबेश दास यांनी या वेळी व्यक्त केले. पदवी घेतल्यानंतर फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी औषध उत्पादनात लक्ष घालावे. जे फार्मसी सुरू करतील त्यांनी शक्यतो डॉक्टरांवर अवलंबून न राहता आपले वेगळे स्थान निर्माण करावे, असे अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त सहाय्यक आयुक्त साहेबराव साळुंखे यांनी सांगितले. शशांक म्हात्रे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी राज्यभरातून आलेल्या फार्मासिस्टना शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन महेश झगडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गायकवाड आणि वल्लभ अंगद यांनी केले. रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील, अजय सोनी, सोनाली पडोळे, शशांक म्हात्रे, गणेश बंगाळे, आशिष हांडे आदींसह रायगड, औरंगाबाद, बुलडाणा, सिन्नर, नागपूर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांतील फार्मासिस्ट शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.