खालापूर : प्रतिनिधी
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्या सूचनेनुसार खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या उपस्थितीत कुंभिवली गावातील विश्वनिकेतन महाविद्यालयात मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व सर्वांनी न विसरता मतदान करावे, असे आवाहन केले. खालापूर तालुका प्रशासनाच्या वतीने या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना नवीन निवडणूक मशिनबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व प्रशिक्षण देण्यात आले. कुंभिवलीचे तलाठी भरत सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य बी. आर. पाटील, उपप्राचार्य एस. बी. कदम, ट्रस्टी सुनील बांगर, निवडणूक मास्टर ट्रेनर सुरेश पोसतांडल, लक्ष्मण कदम, मधुकर पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संघटक प्रा. प्राजक्ता जाधव व प्रा. पीयूष मराठे यांच्यासह महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व विद्यार्थी, विभागप्रमुख व प्राध्यापक या वेळी उपस्थित होते.