उरण : प्रतिनिधी
उरण तहसिल कार्यालय आणि पोलीस ठाण्यालागत असलेली इमारत खंडर बनली आहे. त्यामुळे तिथे सापांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणार्या जनतेच्या आणि कार्यालयामधील कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली असणार्या तहसिल कार्यालगत असणार्या इमारतीमध्ये यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाचे कामकाज सुरू होते.
अनेक वर्षांपासून कार्यालयाचे कामकाज इमारत मोडकळीस आल्याने शासकीय विश्रामगृह येथे हलविण्यात आले आहे. इमारतीचे दरवाजे खिडक्या नाहीशा झाल्या आहेत. आजूबाजूला संपूर्ण गवत वाढले आहे. उंदीर खुशीचा वावर वाढून संपूर्ण परिसर पोखरून काढला आहे. इमारत संपूर्ण खंडर बनली आहे. यामुळे या परिसरात सापांचा वावर वाढला आहे. बाजूलाच लगत तहसील कार्यालय आणि पोलीस ठाणे आहे.
दिवसागणित हजारो नागरिकांचा वावर या दोन्ही कार्यालयामध्ये होत आहे. येणारे नागरिक पार्किंगसाठी येथे वाहने उभी करत असतात. त्या वाहनांमध्ये ही साप घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या कार्यालमधील कर्मचारी काम करीत असतांना कामामध्ये मग्न असतात. याच वेळेला साप जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवितास ही धोका निर्माण होऊ शकतो. या खंडर झालेल्या कार्यालयाची मोडकळीस आलेली इमारत नष्ट करून नवीन इमारत बांधण्यात यावी. याशिवाय या ठिकाणी स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक कर्मचारी करीत आहेत.
पूर्वी हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय होते. मोडकळीस आल्याने हे कार्यालय शासकीय विश्रामगृह येथे आहे. नाहीसे करण्याचा प्रस्ताव आम्ही पाठविला नाही, परंतु आत्ता आम्ही हा प्रस्ताव पाठविण्यासाठी वरीष्ठनाची परवानगी घेतो.
-सी. बी. बांगर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम, विभाग उरण
हे कार्यालय येथे अनेक वर्षांपासून बंद आहेत इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. आजूबाजूला स्वच्छता नसल्याने गवताचे साम्राज्य वाढले आहे. सापांचा वावर वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे, मात्र कोणतीही दुघर्टना घटना घडली तर याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम खाते असेल.
-सामाजिक कार्यकर्ते, अनंत नारंगीकर