मोहोपाडा : वार्ताहर
राज्याचा विकासाचा वेग वाढावा यासाठी राज्य सरकारकडून उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून राज्यासाठीचे महाराष्ट्र राज्य नावीन्यता व स्टार्टअप धोरण तयार करण्यात आले आहे. यामुळे आता नवउद्योजकांना नवीन व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे.
ऑटो टेक सेंटरने शासनाबरोबर करार केला असून स्किल इंडियामार्फत ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये दमदार पदार्पण करत आहे. ऑटोटेकच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत. चौक येथील ऑटो टेक सेंटरमध्ये स्किल इंडियामार्फत मोफत ट्रेनिंग दिले जात आहे, तसेच हे अत्याधुनिक, मल्टी ब्रॅण्ड ऑटो टेक सेंटर असल्याने इथे प्रत्यक्षात कामाचा अनुभवही घेता येणार आहे.
ऑटो टेक सेंटर राज्यातील होतकरू तरुणांना गॅरेजची फ्रॅचाईंजी देत आहे आणि हे अत्याधुनिक गॅरेज उभे करण्यासाठी तरुणांना मार्गदर्शन करून व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण, तसेच शहरी भागातील तरुणांना ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय करून उत्तम नफा कमविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.