पनवेल : प्रतिनिधी
स्वच्छ, सुंदर आणि हरित पनवेल देण्याचा संकल्प पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करताना मंगळवारी (दि. 1) केला. आचारसंहिता असल्याने ज्येष्ठ कर्मचार्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. त्याला या वर्षी तीन वर्षे होत असल्याने मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विधानसभेच्या आचारसंहितेमुळे साधेपणाने सजारा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल नगरपालिकेचे जुने कर्मचारी खापर्डे, मानकामे, पिचड आणि गणेश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रसाळ, उपायुक्त जमीर लेंगरेकर आणि सहआयुक्त तेजस्विनी गलांडे आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल शहरात महापालिका रस्त्यांचे नेटवर्क तयार करीत आहे. पालिका हद्दीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यात येत असून ग्रामीण भागातील भूमिगत गटाराचा आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोतही बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अशोक देशमुख यांचा हसत खेळत तणावमुक्ती आणि संगीत रजनी हा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाचा आनंद महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समितीचे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, मनोहर म्हात्रे आणि नगरसेविका लिना गरड यांनी प्रेक्षकांत बसून घेतला.