जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांचे आव्हान
उरण : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार्या विवेक पाटील यांना जनाची नाही पण किमान मनाची लाज असेल, तर कर्नाळा बँकेत गरीब ठेवीदारांनी जमा केलेले पैसे आधी परत करावेत आणि मगच आमदारकीची निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी दिले आहे.
बालदी पुढे म्हणाले, कर्नाळा बँकेत गोरगरीब जनता, शेतकरी, निवृत्त कर्मचारी, छोटे व्यावसायिक, पेन्शनधारक, ग्रामपंचायती, विजेसाठी लोकांनी भरलेली एमएसईबीची बिले, पतसंस्था, गृहनिर्माण सोसायट्या या सर्वांचे पैसे आहेत, तसेच त्यांच्या मुदतठेवीसुद्धा आहेत, पण या सार्या ठेवी आपल्या बँकेत अडकून पडल्या आहेत.
‘मी माझ्याकडचे पैसे देईन, माझा सातबारा तुमच्याकडे ठेवून घ्या, माझी प्रॉपर्टी विकून मी पैसे परत करेन,’ अशा वल्गना करून निवडणुकीच्या काळात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न विवेक पाटील करीत आहेत, असा आरोप बालदी यांनी केला आहे.
खरं पाहता बँकेचेच पैसे वापरून खरेदी केलेली प्रॉपर्टी विकण्याच्या बाता मारणार्या विवेक पाटलांकडे जरा तरी नीतिमत्ता शिल्लक आहे का, असा प्रश्न पडतो. कारण साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी किती खर्च येतो हे सामान्य लोकांना माहीत आहे. आता तर विवेक पाटील विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी लागणारा पैसा ते कुठून आणणार, असा सवालही बालदी यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी पनवेलमधील भेटीदरम्यान कर्नाळा बँक ठेवीदारांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शेकडो लोक पुढे आले होते. विवेक पाटील, परिस्थिती अशीच गंभीर राहिली, तर हजारो लोक तुमच्या घरासमोर येऊन संताप व्यक्त करून तुम्हाला जाब विचारतील, असा इशारा बालदी यांनी दिला आहे.
लोकांच्या पैशांवर निवडणुका लढविण्यापेक्षा लोकांनी विश्वासाने तुमच्या कर्नाळा बँकेत ठेवलेले पैसे लोकांना कधी परत देता हे सांगा आणि मगच निवडणूक लढवा. तेव्हाच विवेक पाटील यांच्याकडे कायदेशीर आणि नैतिक बाजू तरी शिल्लक आहे, हे यावरून दिसून येईल, असे शेवटी बालदी यांनी म्हटले आहे.