Breaking News

रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी

उरण, पेणमध्ये काँग्रेसचे उमेदवार

अलिबाग : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाने आपल्या 52 उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी (दि. 1) रात्री जाहीर केली. यात उरण आणि पेणमध्येही काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे विशेषत: शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

काँग्रेसच्या यादीत रायगड जिल्ह्यातील तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात माजी आमदार माणिक जगताप (महाड), माजी जिल्हा परिषद व प्रदेश सदस्य डॉ. मनीष पाटील (उरण) आणि युवक काँग्रेसच्या माजी प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे (पेण) यांच्या नावांचा समावेश आहे. रायगडात शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. आघाडीच्या अघोषित जागावाटपात महाडची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे, मात्र उरण आणि पेणमध्येही काँग्रेसतर्फे उमेदवार जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाली आहे.

काँग्रेसच्या अनपेक्षित पवित्र्यामुळे शेकापमध्ये संताप व्यक्त होत आहे. महाडमध्ये शेकापचा प्रभाव नाही, मात्र पेणमधून शेकाप आमदार धैर्यशील पाटील प्रतिनिधित्व करतात, तर उरणमधून माजी आमदार विवेक पाटील पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. त्यांना आता विरोधकांबरोबरच काँग्रेसच्या उमेदवाराचाही सामना करावा लागणार असल्याने शेकापच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, काँग्रेस जिल्ह्यात आणखी उमेदवार जाहीर करणार का, याकडे आघाडीतील नेत्यांसह जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply