तिकीट वाटपावरून संजय निरुपम नाराज
मुंबई : प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावर प्रचंड संताप व्यक्त केला असून, काँग्रसला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली आहे. निरुपम यांच्या या धमकीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिकीट वाटपात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. निरुपम यांनी एक ट्विट करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. पक्षाला माझ्या सेवेची गरज उरलेली दिसत नाही. मुंबईत विधानसभा निवडणुकीचं तिकीट वाटप सुरू असून त्यात मी काही लोकांच्या नावांची शिफारस केली होती. मी दिलेली नावं वगळण्यात आल्याचं मला समजलं आहे. त्यामुळे असं होत असेल, तर निवडणूक प्रचारात भाग घेणार नसल्याचं मी पक्ष नेतृत्वाला कळवलं आहे. हा माझा शेवटचा निर्णय आहे, असं निरुपम यांनी म्हटलं आहे. पक्षाला गुडबाय म्हणण्याची माझ्यावर वेळ येणार नाही, अशी मला आशा आहे, मात्र पक्षनेतृत्व ज्या पद्धतीने वागत आहे, त्यावरून हाही दिवस दूर नसल्याचं दिसून येतंय, असं सांगत निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याची धमकीही दिली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत निरुपम यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे काँग्रेस समोरची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. निरुपम हे उत्तर भारतीय मतदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेसने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या असून त्यातून निरुपम समर्थकांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे निरुपम गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणातही काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे.