अलिबाग : जिमाका
जिल्हास्तरीय स्वीप कोअर समितीची बैठक गुरुवारी
(दि. 3) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेण्यात आली. या वेळी रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कोअर समिती सदस्यांनी कल्पक उपक्रम राबवावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
मतदार जागृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय अधिकारी आणि अशासकीय संस्थांचे पदाधिकारी यांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय स्वीप कोअर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेण्यात आली. त्या वेळी डॉ.सूर्यवंशी समिती सदस्यांना मार्गदर्शन करीत होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत अधिक असावी, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
डॉ. विजय सूर्यवंशी या वेळी म्हणाले की, अगदी तळागाळाच्या मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी आणि मतदानाच्या टक्केवारीमध्ये संख्यात्मक वाढ होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतीत, एसटी बसचे मार्ग, विविध मॉल्स, सिनेमागृहे, बँका येथे विविध प्रसिध्दी साहित्याच्या (पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज इ.) माध्यमातून तसेच जिंगल्स, ऑडिओ व व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदानविषयक जनजागृती करण्यात येत आहे, तसेच महिला
बचतगटांमध्ये स्पर्धा घेऊन मतदानवाढीसाठी प्रयत्न करावा. चुनाव पाठशाळासारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
विशेषत: नवमतदारवर्गासाठी विविध महाविद्यालये, सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, विविध शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये आणि शासकीय, निमशासकीय, कॉर्पोरेट संस्था येथे मतदान करण्यासाठीचे सामूहिक शपथग्रहण, स्वाक्षरी अभियान, संकल्पपत्र भरून घेणे, पथनाट्य सादरीकरण, रॅली काढणे, विविध प्रासंगिक उत्सवातून मतदानविषयक जनप्रबोधन, अन्य सांस्कृतिक आणि नावीन्यपूर्ण उपक्रम याचे नियोजन करण्यात येत आहेत. याशिवाय अंगणवाडी सेविका, विविध स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील घराघरांमध्ये मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
या वेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, स्वीप समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, अति. जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, कामगार उपायुक्त प्रदीप पवार तसेच स्वीप समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.