विनोद घोसाळकरांचे काम करणार -कृष्णा कोबनाक

माणगाव : प्रतिनिधी
पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप, सेना महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचे काम प्रामाणिकपणे करून त्यांना निवडून आणणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी श्रीवर्धन येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी (दि. 3) श्रीवर्धन येथे भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्या समवेत भाजपचे कृष्णा कोबनाक उपस्थित होते. त्यानंतर कोबनाक यांनी श्रीवर्धन मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. देशात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने अनेक विकासकामे मतदारसंघात करण्यात आम्ही यशस्वी झालो. दोन राष्ट्रीय महामार्ग, पिण्याच्या पाण्याच्या योजना, मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे, वैयक्तिक लाभाच्या योजना अशी अनेक कामे भाजपच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. विरोधी राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष त्यांच्याकडे सत्ता नसतानाही या विकासकामांचे फुकटचे श्रेय घेऊ पाहत आहे, हे आता मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आल्याने मतदारसंघात भाजप वाढत आहे. भाजपची वाढलेली ताकद पाहून विकासकामांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी उमेदवारीसाठी उत्सुक होतो. पक्षनेतृत्वाने कामाला लागा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही मतदारसंघात कामाला लागलो होतो, असे कोबनाक यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, राज्यात महायुती झाली. जागावाटपात श्रीवर्धन मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. पक्षनेतृत्वाचे आदेश आल्याने आम्ही या निवडणुकीत आमची पूर्ण ताकद विनोद घोसाळकर यांच्या पाठीशी उभी केली असून, कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात यावेळेस महायुतीच्या माध्यमातून आम्ही परिवर्तन घडविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही कृष्णा कोबनाक यांनी या वेळी ठामपणे सांगितले.