मानवी साखळी आंदोलनाला उदंड प्रतिसाद

पनवेल ः हरेश साठे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. 10) रायगडसह ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांत भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो जणांनी सहभाग घेऊन मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने ‘दिबां’च्या नावासाठी जनशक्ती एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
’हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, वाया जाऊ द्यायचे नसते’ आणि ’संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही’ हे प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे वचन घेऊन हे आंदोलन झाले. ‘दिबां’च्या नावासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत अशीच भूमिका या आंदोलनात पहायला मिळाली. पनवेलमधील डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सीबीडी बेलापूर अशी तब्बल 12 किमी अंतराची मानवी साखळी बघताना ही ‘दिबां’साठी एकतेची साखळी असल्याचे अधोरेखित झाले. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यात एकूण जवळपास 200 किमी अंतराची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यामध्ये जवळपास 40 हजारांहून जास्त जणांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. या मानवी साखळीत म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जे. डी. तांडेल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शेकडो संघटना, वारकरी संप्रदाय, कृती समितीचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, हजारो नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनाला विविध समाज, पक्ष, संस्था-संघटना, पत्रकार यांनीही पाठिंबा दिला असल्याचे सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. स्थानिक आगरी पुढार्यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध केल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला ‘दिबा’साहेबांचे नाव द्यावे यासाठी सभागृहात लावण्यात आलेल्या अभियान बॅनरवर महाविकास आघाडीतील स्थानिक पुढार्यांनी स्वाक्षरी केली होती, पण त्यांची अचानकपणे भूमिका बदलली आणि या स्वार्थी पुढार्यांचे त्यानिमित्त समाजासमोर पितळ उघडे झाले आहे. ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला दिल्यास मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आजचे मानवी साखळी आंदोलन प्रशासनाला जाग येण्यासाठी हे पहिले पाऊल असून प्रकल्पग्रस्तांची एक लाख लोकं 10 लाख लोकांवर भारी पडतील, असा इशाराही या वेळी त्यांनी प्रशासनाला दिला.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या भागातही लोकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मानवी साखळी आंदोलन यशस्वी केले. या वेळी आमदार मंदाताई म्हात्रे, राजू पाटील, गणपतराव गायकवाड, माजी खासदार जगन्नाथ पाटील, संजीव नाईक, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, आगरी फोरमचे गुलाब वझे, भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी विविध ठिकाणी या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाईंदर, वसई, पालघर येथील स्थानिक भुमिपुत्रांनीही हजारोंच्या संख्येेने यात सहभागी होऊन हे मानवी साखळी आंदोलन यशस्वी केले. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या भुमिपुत्रांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास येत्या 24 जून रोजी हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरून सिडकोला घेराव घातला जाईल, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सरकारला दिला आहे.
गगनभेदी घोषणा आणि वरुणराजाची साथ
‘विमानतळाला दिबासाहेबांचेच हवे नाव,’ अशी गर्जना करताना ‘दिबा’साहेब झिंदाबाद, ‘दिबा’साहेब अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कोविडसंदर्भातील सर्व नियम पाळून हे आंदोलन झाले. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता, परंतु निसर्गसृष्टीलासुद्धा ‘दिबा’साहेबांचेच नाव मान्य असल्याने आंदोलकांना पावसाची बाधा पोहचू नये यासाठी वरुणराजाने विश्रांती घेत आंदोलनाला साथ दिली. मानवी साखळीत ‘दिबां’चे चित्र असलेले मास्क आणि रक्तरंजित झेंडे, बॅनर्स, हॅण्ड होर्डिंग्ज लक्षणीय होते. या आंदोलनातून 24 जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव घालण्याची पूर्वतयारीही दिसून आली आणि जोपर्यंत ‘दिबां’चे नाव नाही, तोपर्यंत संघर्ष कायम असल्याचा निर्धारही स्पष्टपणे दिसून आला.
‘दिबां’च्या नावासाठी संघर्षासही तयार -लोकनेते रामशेठ ठाकूर
या वेळी बोलताना माजी खासदार तथा सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकहितासाठी खर्च केले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, बहुजन समाजासाठी संघर्ष केला. त्यांच्या संघर्षातून साडेबारा, साडेबावीस टक्के भूखंडासह अनेक निर्णय राज्यभर लागू झाले आणि त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला झाला. सरकार कुठलेही असो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचेच नाव दिले पाहिजे, ही आमची कायम भूमिका राहणार आहे. ते पुढे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा अधिकार दि. बा. पाटीलसाहेबांमुळे मिळाला. संघर्ष करीत राहत त्यांनी सर्वसामान्य जनतेला जगायला शिकवले. असे हे ‘दिबा’ महाराष्ट्रातील भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त व आम्हा सर्वांची अस्मिता आहेत. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे यासाठी आम्ही वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत. आम्ही 24 जूनला सिडको भवनाला घेराव तर घालणारच आहोत, पण त्यापुढेही वेळ पडल्यास आणखी संघर्ष करायलाही तयार आहोत.
‘दिबां’चे नाव द्यावे ही सर्वांची इच्छा -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिलेच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे आणि यासाठी भूमिपुत्र, स्थानिक माणूस, प्रकल्पग्रस्त एकवटलेला आहे. सन 2012पासून सगळ्यांची ही मागणी व इच्छा आहे. असे असताना अचानकपणे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे स्व. बाळासाहेबांचे नाव रेटत आहेत. बाळासाहेबांबद्दल सर्वांना आदर आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले गेले आहे. महाराष्ट्रातील इतर मोठ्या प्रकल्पांनाही त्यांचे नाव देता येऊ शकते, परंतु लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब येथील भूमिपुत्र आहेत. ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे आणि म्हणूनच त्यांचे नाव येथील विमानतळाला देणे गरजेचे आहे. भाजप, आरपीआय प्रत्यक्षपणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. या मानवी साखळीत सर्व पक्षांचे नेते नसतील, पण ज्यांना ‘दिबा’साहेबांबद्दल आस्था आहे असे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ‘दिबा’साहेबांच्या नावासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि संघर्ष करण्यास आम्ही कायम तयार आहोत.

