नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
मुरूड : प्रतिनिधी
शहरातील अजित प्रभाकर जोशी यांच्या निवासस्थानी 30 नोव्हेंबर 2018 रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान सात लोक जखमी झाले होते. या सिलिंडर स्फोटाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मुरूड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अजित जोशी यांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटामुळे तीन किलोमीटरच्या परिसरात हादरा बसला होता. त्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांनी हा गॅस सिलिंडरचा स्फोट असे मोघम उत्तर दिले होते, मात्र हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या तपासणी अहवालात सिलिंडर फुटल्याची नोंद नाही. स्फोटाच्या घटनेनंतर सिलिंडर व्यवस्थित बाहेर काढण्यात आला होता. गॅस कंपनीच्या म्हणण्यानुसार सिलिंडर स्फोट झाला, तर फक्त सहा मीटर परिसरात नुकसान होते, मात्र येथे तर स्फोटामुळे तीन किमीचा परिसर हादरला होता. शिवाय जर गॅस घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात गॅस टाकीचे तुकडे सापडले असा उल्लेख नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
सध्या देशात अतिरेकी कराव्या सुरू असून, अजित जोशी यांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुरूड तहसीलदारांना दिलेल्या या निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी संघर्ष समिती अध्यक्ष प्रकाश वीरकुड, राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे उपाध्यक्ष जाहिद फकजी, दत्ता भोसले, उदय चौलकर, बबन खोत, नझीर फहीम, प्रभाकर मसाल, संजय डांगे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.