कर्जत : बातमीदार
वाहनांना बंदी असल्याने माथेरानमधील प्रमुख वाहन घोडा असून, येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून घोड्याला विशेष महत्त्व दिले जाते. दसर्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) अश्वचालकांनी सजवलेल्या घोड्यांची विधिवत पूजा करून माथेरानमध्ये मिरवणूक काढली होती. दसर्याच्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजता घोडेमालकांनी आपल्या घोड्यांच्या खुरांची पूजा केली व फुलांचे हार व झुल टाकून सजविलेल्या घोड्यांची तबेल्यातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत माथेरानमधील सर्व घोडे सहभागी झाले होते. या वेळी स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम, उपाध्यक्ष गणेश घावरे, सचिव विकास रांजाणे व कोषाध्यक्ष प्रकाश सुतार यांच्यासह अश्वपालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.