Breaking News

मनपा निवडणुकांवेळी शिवसेना वॉर्ड रचनेत सोयीस्कर बदल करते

जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

मुंबई ः प्रतिनिधी
महापालिकेच्या निवडणुका आल्या की सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी महापालिका अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा गंभीर आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना या दोन पक्षांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता ऐरोली येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. निवडणुका आल्यावर सत्ताधारी शिवसेना मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते, असा आरोप करून अशी कृत्ये लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणीही आव्हाड यांनी केली.
शिवसेना मोठा भाऊ म्हणून जिल्ह्यात आदर करू, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा या वेळी आव्हाड यांनी दिला. आम्ही आघाडी धर्म पाळायचा, मात्र तुम्ही पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचे? राजकारणातील गणिते कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत, असेही आव्हाड या वेळी म्हणाले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply