Breaking News

भाजपचा विजयी संकल्प

रविवारी प्रदेश भाजपच्या आदेशानुसार विजयी संकल्प बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या युवाशक्तीची ताकद दाखविण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले आहे. युवाशक्तीचा हा जोष पाहता या वेळीही भाजप सर्वच निवडणुकांमध्ये यशस्वी होऊन पुन्हा एकदा देशावर आणि राज्यावर भाजपचीच सत्ता येईल.

लोकसभा निवडणुका जसजशा समीप येऊ लागल्यात तसतसे देशातील राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. नुकत्याच झालेल्या पुलवामा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारतीय नौदलाने पाकव्याप्त काश्मिरात हवाई हल्ले करून जैश या अतिरेकी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळे दोन्ही देशांतील सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका वेळेत होतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात असतानाच दस्तुरखुद्द केंद्रीय निवडणूक आयोगानेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या नियोजित वेळेतच होतील, असे जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुलवामा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलाच्या तिन्ही दलांना पूर्ण अधिकार देत पाकची राजनैतिक कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याने सर्वसामान्यांमध्ये मोदींविषयी आदर निर्माण झाला आहे. मोदींनीही या हवाई हल्ल्याचे सारे श्रेय हे बहाद्दर हवाई दल, नौदल आणि भूदलाला देत अवघा देश तुमच्या पाठीशी आहे हे कृतीने दाखवून दिले आहे. त्यांच्या या निर्णयाने स्वाभाविकच सर्वसामान्यांच्या मनातही मोदींची क्रेझ आणखी वाढीस लागली आहे. अर्थात देशातील राजकारण आणि देशाची सुरक्षा हे वेगवेगळे विषय असल्याने त्याचे श्रेय कुणीच घेऊ नये. मोदींनीही हे आमच्यामुळेच झाले असे कधीच जाहीर केले नाही, पण सर्वसामान्यांच्या मनात मात्र मोदींच्या कणखरपणामुळे हे हल्ले होऊ शकले हे चांगलेच बिंबित झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुलवामा मुद्दा निश्चित चर्चिला जाईल. याच पार्श्वभूमीवर रविवारी महाराष्ट्र भाजपतर्फे राज्यभरात भाजपतर्फे विजयी संकल्प बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला पनवेल शहर आणि तालुक्यातही उदंड प्रतिसाद लाभला. सिडको अध्यक्ष पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली विजयी संकल्प बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता या वेळीही 2014 सारखीच भाजपची लाट निर्माण झाल्याचा भास पनवेलकरांना झाला. कारण या रॅलीत सहभागी झालेली युवाशक्ती हीच देशाची भावी शक्ती असल्याने त्या युवाशक्तीला एकत्र बांधून ठेवण्यात भाजप यशस्वी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ निवडणुकीपुरते युवाशक्तीला वापरण्याची भाजपाची भूमिका नाही, तर त्या शक्तीचा विधायक कार्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याकडे भाजप नेतृत्व गांभीर्याने आणि विचारपूर्वक पाहत आहे. आगामी लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, या दोन्ही ठिकाणी युवाशक्तीच उपयुक्त ठरणार आहे. एक नवा भारत निर्माण करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उराशी बाळगले आहे. त्यासाठी या युवाशक्तीला राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रांत प्रोत्साहित करण्यासाठी भाजप नेतृत्व प्रयत्नशील आहे. भाजपचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह असाच आहे.

Check Also

‘सीएए’ आणि गैरसमज

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए अर्थात नागरिकत्व दुरूस्ती कायदा देशात लागू करण्याबाबत घोषणा केली …

Leave a Reply