कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील नेरळजवळील धामोते गावाच्या हद्दीत स्वयंभू भवानी मातेचे स्थान आहे. पंचक्रोशीचे रक्षण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली ही भवानी माता एका झाडाखाली निवास करून आहे.
नेरळ-कळंब रस्त्यावर भवानी मातेचे मंदिर असून केवळ धामोते गावाचे नाही तर परिसराचे श्रध्दास्थान म्हणून या स्वयंभू देवीची प्रचिती आहे. धामोते गावातील सर्व रहिवासी आजही शुभ कामे करण्यापूर्वी भवानी मातेला श्रीफळ वाढवितात. शेतीची कामे सुरू करण्यापूर्वी भवानी मातेचे नमन करण्याची प्रथा कायम आहे. या ठिकाणी श्रद्धेने नमस्कार केल्यास तो तुळजापूर निवासी भवानी मातेला पोहचतो अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या स्वयंभू मंदिरातील देवीची श्रद्धेने पूजाअर्चा करणारे असंख्य भक्त नवरात्रोत्सव काळात धामोते येथे आवर्जून येत असतात. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान म्हणून ही देवी ओळखली जाते. त्यामुळे ग्रामस्थ श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात.
धामोते गावाच्या भवानी माता देवीचे महत्त्व म्हणजे ती एका झाडाखाली निवास करून आहे. लिंबाच्या पुरातन वृक्षाखाली वसलेली भवानी माता अन्य ठिकाणच्या मंदिरांचा विचार करता
आगळीवेगळी वाटते. अनेक दशके उभ्या असलेल्या या लिंबाच्या झाडाचे महत्त्व म्हणजे ते झाड सूर्याची दिशा पूर्व असो की पश्चिम, भवानी माता कायम झाडाच्या सावलीत विसावलेली असते. तुळजा भवानी मातेचे हे सुंदर रूप म्हणून ओळख सांगणार्या धामोते गावातील भवानी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव काळात दररोज धार्मिक कार्यक्रम साजरे होत आहेत.