पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे संसर्ग गेले काही दिवसापासून पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सामाजिक अंतर ठेवा अशी त्रिसूत्री सांगितली आहे. याचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना केले आहे. मागील वर्षासारखी परिस्थिती आपल्याला नको असेल, पुन्हा आपल्याला लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. बाजारपेठा, मॉल, हॉटेल, लग्न समारंभ अशा सार्वजनिक ठिकाणी बर्याचवेळा गर्दी दिसून येते. त्याठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही, अशा ठिकाणी एक जण जरी पॉझिटिव्ह किंवा असिम्टेमॅटिक असेल तर अशा एकामुळे अनेक जणांना संक्रमण होण्याची भीती असते. आपण एकदा लॉकडाऊन अनुभवले आहे. आता परत तशी परिस्थिती आपल्याला कोणालाच नको आहे. म्हणूनच सर्व नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे.