Breaking News

करंजा बंदर 14 एप्रिलपर्यंत बंद

मासळी विक्रीसाठी शेकडो मच्छीमारांची ससून डॉकमध्ये मोठी गर्दी

उरण : प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे ससुनडॉक बंदरात लॅण्डींग करण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर शेकडो टन मासळीने भरलेल्या शेकडो मच्छीमार बोटी मासळी विक्रीसाठी करंजा बंदरात दाखल होऊ लागल्या आहेत. यामुळे करंजा बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात होणार्‍या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढला आहे. या गर्दीमुळे होणारा कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात येणार्‍या मच्छीमार बोटी आणि खरेदी-विक्रीसाठी दाखल होणार्‍या बोटींना उरण पोलिसांनी 28 मार्चपासून अखेर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात वाढलेल्या कोरोनाच्या प्रकोपाला रोखण्यासाठी आधी संचारबंदी आणि त्यानंतर 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील ससुनडॉक बंदरात मासेमारी बोटींना लॅण्डींग, मासळी लिलाव आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्याआधी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या अनेक बोटी आता किनार्‍यावर परतल्या असून या बोटींमध्ये असलेले मासे करायचे काय ? असा प्रश्न मच्छिमारांना पडला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वसई तसेच कोकण किनारपट्टी भागातील अनेक मच्छिमारांवर कोरोनामुळे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मासेमारी करून परतलेल्या शेकडो बोटी गेल्या काही दिवसांपासून ससुनडॉक बंदरामध्ये हजारो टन आणि लाखो रुपये किंमतीची मासळी भरुन उभ्या होत्या. मात्र वेगाने वाढणार्‍या कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी मच्छीमारांना ससुुुनडॉक बंंदरातील सर्व व्यवहारावरच बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नाशिवंत मासळी खराब होण्याआधी शेकडो मच्छीमारांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उरण येथील करंजा मच्छीमार बंदरात मासळी उतरवून आणि विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे केली होती. राज्यातील हजारो मच्छीमारांनी केलेली विनंती आणि त्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख व अन्य संबधित विभागाच्या अधिकार्‍यांनी करंजा बंदरामध्ये मासळी उतरवून आणि विक्री करण्यासाठी राज्यातील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून शेकडो टन मासळीने भरलेल्या शेकडो मच्छीमार बोटी मासळी विक्रीसाठी करंजा बंदरात दाखल होऊ लागल्या आहेत. यामुळे करंजा बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार बोटी आणि खरेदी-विक्रीसाठी गर्दी होऊ लागली आहे. करंजा बंदरामध्ये होणार्‍या मोठ्या प्रमाणात गर्दीवर पोलिसांनाही नियंत्रण ठेवणे मात्र अशक्य झाले होते.

करंजा बंदरात दाखल होऊ लागलेल्या मासेमारी बोटी आणि खरेदी-विक्रीसाठी नागरिकांची गर्दी यामुळे कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता असल्याने आणि वारंवार आवाहन केले जात असतानाही नागरिक पोलिसांनी करीत असलेल्या आवाहनालाही न जुमानता मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असल्याने शनिवार 28 मार्चपासून करंजा बंदरात मच्छीमार बोटी आणि खरेदी-विक्रीसाठी दाखल होणार्‍या बोटींना बंदी घालण्यात आली आहे.

-जगदिश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply