अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात काम करणार्या दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या जिल्ह्यातील कोविड योद्ध्यांची संख्या सहा झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत अलिबागमध्ये 50च्या वर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसोलेशन कक्षात कोरोनाबाधितांशी थेट संपर्क आला असल्याने या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
यापूर्वी महाड व कर्जत सरकारी रुग्णालयांतील नर्सेस कोरोनाबाधित झाल्या होत्या, तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित झालेल्या कोविड योद्ध्यांची संख्या सहा झाली आहे.
दरम्यान, अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांनी शनिवारी (दि. 30) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांची भेट घेऊन आम्हाला सुरक्षाविषयक साधने उपलब्ध व्हावीत तसेच निवासाची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा मागण्या केल्या. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन डॉ. गवई यांनी दिले.
आमच्याकडे वर्ग-4ची 67 पदे रिक्त आहेत. काही पदे बाह्य यंत्रणेमार्फत आम्ही भरण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. अपुर्या मनुष्यबळामुळे काम करणे अवघड झाले आहे. उपलब्ध कर्मचार्यांच्या मदतीने आम्ही कोविड-19विरोधातील लढाई लढत आहोत.
-डॉ. प्रमोद गवई, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड