पनवेल ः वार्ताहर
पनवेलमधील एका प्रामाणिक रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात विसरलेली पर्स महिलेशी संपर्क साधून त्यांना परत केली. त्याबद्दल त्या रिक्षाचालकाचे कौतुक करण्यात येत आहे.
मुंबई येथे राहणार्या विनिता जोशी या गव्हर्नमेंट ऑडिटर असून त्या शासकीय कामासाठी पनवेल येथे आल्या होत्या. त्या रिक्षा क्र. एमएच-46-एझेड-5074 या रिक्षातून प्रवास करताना घाईघाईमध्ये त्यांच्याकडे असलेली एक पर्स रिक्षातच विसरल्या व त्या मुंबई येथे निघून गेल्या. हे जेव्हा रिक्षाचालक विकास दत्ताराम गुरव (रा. श्रीगणेश कृपा अपार्टमेंट, काळुंद्रे) याला समजले त्या वेळी त्याने पर्समधील कार्डमधून त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांना तुमची पर्स रिक्षातच विसरल्याची माहिती दिली. त्यानंतर विनिता जोशी या पनवेलला त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या व या रिक्षाचालकाला त्यांनी बोलावून घेतले. त्या पर्समध्ये त्यांची महत्त्वाची शासकीय कागदपत्रे व रोख रक्कम होती, परंतु कुठल्याही वस्तूला रिक्षाचालक विकास गुरव यांनी हात लावला नव्हता. या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले, तसेच त्याला बक्षीसही देण्यात आले, परंतु त्याने बक्षीस घेण्यास नकार दिला. त्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.