
कर्जत : बातमीदार
विधानसभेच्या कर्जत मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरीचा त्रास जाणवला नाही. त्याने शिवसेना हा पक्ष पहिल्यांदा सुखावला आहे. या वेळी आठ इच्छुक असूनदेखील बंडखोरी शमविण्यात सेना नेतृत्वाला यश आले आहे.
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात सेनेच्या अधिकृत उमेदवाराला 1999, 2009 आणि 2014 मध्ये बंडखोर उमेदवारांमुळे पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र या वेळी बंडखोरीमुळे पराभव झाला, अशी सबब प्रामुख्याने शिवसैनिक देऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आठ जण इच्छुक होते. त्यातील सात इच्छुकांनी माजी उपजिल्हाप्रमुख आणि 2014च्या निवडणुकीतील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देऊ नये, असे लेखी पत्र पक्ष नेतृत्वाला दिले होते, अशी चर्चा होती, मात्र पक्ष नेतृत्वाने सध्या कोणत्याही पदावर नसलेले थोरवे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्या वेळी सेनेचे सात इच्छुक काय करणार, असा प्रश्न समोर आला होता. त्यातील एका इच्छुकाने शिवसेना पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली आहे. उर्वरित इच्छुक संतोष भोईर, भाई गायकर, सुरेश टोकरे, सुनील पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले होते, मात्र भोईर हे उमेदवारी नाकारल्यानंतर दुसर्याच दिवशी शिवसेनेच्या पक्षकार्यात दिसून आले. उपजिल्हाप्रमुख असलेले भाई गायकर आणि सुनील पाटील यांची मनधरणी करण्यात पक्षाचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवे यांना यश आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले सुरेश टोकरे हे निवडणूक रिंगणात उतरतील असे शेवटपर्यंत वाटले होते, मात्र त्यांनी पिंगळे यांच्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे तत्कालीन कर्जत तालुकाप्रमुख भरत भगत यांनी 1999मध्ये, माथाडी कामगार युनियनचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत पिंगळे यांनी 2009मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र साटम यांचा पराभव झाला होता, तर 2014मध्ये तत्कालीन उपतालुकाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेने उमेदवारी नाकारली म्हणून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले हनुमंत पिंगळे यांचा पराभव केला होता. राज्य विधानसभेच्या मागील चार निवडणुकांत तीन वेळा बंडखोरी झाल्याने शिवसेनेला पराभूत व्हावे लागले होते. या वेळी भाजप शिवसेनेसोबत असून भाजपकडून निवडणूक लढविण्याची प्रबळ इच्छा असलेले माजी आमदार देवेंद्र साटम यांनीदेखील अंतिम क्षणी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे निवडणुकीत शिवसेना व भाजपची ताकद कळणार आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे दाखविण्याची संधी शिवसैनिकांना चालून आली आहे व त्याचे आव्हानही असणार आहे. शिवसैनिक हा उमेदवार नाही तर आदेश मानतो व त्यानुसार धनुष्यबाणावर मतदान होते की राष्ट्रवादीमध्ये गेलेले पिंगळे आणि टोकरे हे दोघे मतदान आपल्याकडे वळवून शिवसेनेची मते फोडतात हे पाहायला हवे.