पनवेल : लक्ष्मण ठाकूर

हर हर महादेव, जय भोलेनाथ… अशा जयघोषाने पनवेल शहर आणि परिसरातील शिवमंदिरे सोमवारी (दि. 4) दणाणून गेली होती. निमित्त होते महाशिवरात्री सोहळ्याचे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही महाशिवरात्रीचा सोहळा सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्वच शिव मंदिरांत शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे सारे वातावरण शिवमय होऊन गेले होते. यानिमित्ताने खांदेश्वर येथे मोठी जत्राच भरली असून, भाविकांबरोबरच आबालवृद्धांनी या जत्रेचा आनंद मनमुरादपणे लुटला. विविध सामाजिक संस्था, स्थानिक नगरसेवक, नगरसेविकांनी भाविकांच्या सोयीसाठी पाणपोई, अल्पोपहाराची सोय केली होती. पोलीस बंदोबस्तही सर्वत्र तैनात करण्यात आला होता. पनवेल शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर, शिव मंदिर, विरुपाक्ष मंदिर, बालाजी मंदिर, सावरकर चौक मंदिर, दुर्गामाता मंदिर, कोळीवाडा येथील मंदिर या ठिकाणी शिवभक्तांनी पहाटेपासूनच पूजाअर्चा करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. पाणी, दूध, बेल, फळे महादेवाला वाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी मंदिर येथे माहेश्वरी महिला मंडळ व प्रगती महिला मंडळाच्या वतीने शिवभक्तांना खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष नगरसेवक राजू सोनी, दिनेश गिल्डा, उमेश इनामदार, महेश पाटकर यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थित राहून शिवभक्तांना खिचडीचे वाटप केले. त्याचा भक्तांनी लाभ घेतला.