पुणे ः प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका दाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. ही घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, याप्रकरणी आरोपी अमोल भगवान बलखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित 20 वर्षीय महिला ही घराच्या पाठीमागे तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या आंघोळीच्या खोलीत आंघोळ करत असताना तिच्या पतीचा मित्र, आरोपी अमोल याने चोरुन तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर आरोपी अमोलने पीडितेला अनोळखी ठिकाणी बोलावून संबंधित फोटो आणि व्हिडिओ दाखवून माझ्याशी प्रेमसंबंध ठेव नाही तर फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर पाठवून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. आरोपी अमोल हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा प्रकार वारंवार सुरू राहिल्याने अखेर पीडित महिलेने पतीला याबाबत माहिती दिली. पण आपलीच बदनामी होईल या भीतीने त्या पती-पत्नीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सद्यस्थितीला दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी आरोपी अमोल याला अटक केली आहे.