Breaking News

उरणमध्ये ‘शिटी’ वाजली

अपक्ष महेश बालदी यांचा ऐतिहासिक विजय

उरण ः वार्ताहर

उरणमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी 74463 मते मिळवून शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर (68745 मते) यांचा 5718 मतांनी पराभव केला. शेकाप महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील हे तिसर्‍या स्थानावर फेकले गेले असून त्यांना (61456 मते) मिळाली आहेत. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील हे तिसर्‍या क्रमांकार फेकले गेले आहेत.

उरण विधानसभा मतदार संघात आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र तिरंगी लढत महायुतीचे व सेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर, महाआघाडी शेकापचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्यात झाली. या तीनही उमेदवारांनी विजयासाठी पराकाष्ठा केली होती. पाचव्यांदा निवडणूक लढविणारे शेकापचे विवेक पाटील आणि दुसर्‍यांदा उमेदवारी मिळालेले सेनेचे मनोहर भोईर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सेनेच्या मनोहर भोईर यांच्या प्रचारसभेसाठी उध्दव ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. मात्र या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात एकहाती प्रचार करीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर एकट्याने मतदारसंघात सभा घेऊन लक्षवेधी विजय संपादन केला आहे.

गुरुवारी (दि. 24) सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर नागरिकांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. पहिल्या एक-दोन फेर्‍या वगळता सुरुवातीपासूनच बालदी यांनी तीन आकड्यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. ती आघाडी बालदी यांनी 24व्या अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेलेले मनोहर भोईर यांनी दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. या निवडणुकीत अन्य उमेदवार मनसेचे अतुल परशुराम भगत (5093 मते), बसपाचे संतोष मधुकर पाटील यांना (1358) मते, बसपाचे राकेश नारायण पाटील यांना (1712) मते, अपक्ष उमेदवार मधुकर सुदाम कडू (1580 ), संतोष शंकर भगत ( 1133) मते मिळाली आहेत. तर नोटालाही तब्बल 3072 मते मिळाली आहेत.

महेश बालदी विजयी झाल्याने उरण शहरात मोठी विजय रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर भाजप अध्यक्ष कौशिक शहा, भाजप जिल्हा वाहतूक संघटना अध्यक्ष सुधीर घरत जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नीता महेश बालदी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, चंद्रकांत गायकवाड, नगरसेवक राजेश ठाकूर, महेश बालदी मित्रमंडळ यांच्यासह उरणचे नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. उरण शहरात महेश बालदी यांना पुष्पहार घालून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply