अलिबाग : प्रतिनिधी
अरबी समुद्रात कायर नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वार्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, तसेच खोल समुद्रात गेलेल्या बोटी परत किनार्यावर आणाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या हजारो मच्छीमार बोटी रायगडच्या वेगवेगळ्या किनार्यांवर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई ते मांडवा प्रवासी जलवाहतूक सेवादेखील बंद करण्यात आली आहे.
कायर वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ताशी 55 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. त्याचबरोबर ज्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत, त्यांनी तातडीने किनारा गाठावा, अशी सूचना सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागामार्फत देण्यात आली आहे.
पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, कर्मचारी मच्छीमार बंदरांवर नजर ठेवून आहेत. चक्रीवादळामुळे निर्माण होणार्या उधाणाचा फटका किनार्यावरील घरे, शेती, बागा यांनाही बसू शकतो. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहावे, असेही सूचित करण्यात आले आहे. रायगडचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी आजही जिल्ह्यातील प्रमुख मच्छीमार बंदरांना भेटी देऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे मुंबई ते मांडवा दरम्यानची जलवाहतूक सेवा यंदा उशिरा सुरू झाली. त्यानंतरही ती अनियमितच होती, मात्र आता चक्रीवादळ रायगड, मुंबईच्या दिशेने येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सुलभ वाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबईला खरेदीसाठी जाणार्यांचा विरस झाला आहे.
-श्रीवर्धनमध्ये मच्छीमारी नौका किनार्यावर
श्रीवर्धन : हवामान खात्याने ‘कायर‘ चक्रीवादळाचा इशारा दिल्याने श्रीवर्धन परिसरातील मच्छीमारांनी आपल्या नौका किनार्यावर सुरक्षित ठिकाणी शाकारून ठेवल्या आहेत. त्यामुळे सध्या मच्छीमारी ठप्प झाली आहे. यंदा 1 सप्टेंबरपासून मासेमारी सुरू झाली खरी, पण त्या दिवसापासून आजतागायत सतत हवामान बदलत आहे. खोल समुद्रात वादळीवारे वहात असून, मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यातच अरबी समुद्रात कायर नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून, प्रादेशिक हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर वादळी वार्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यामधील मच्छीमारांनी आपल्या नौका जीवना बंदर, दिघीखाडी, मूळगावची खाडी, तसेच आदगावच्या किनारी भरटखोल येथे नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये मच्छीमारांवर आभाळच कोसळले आहे.
चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने इशारा दिला आहे. त्यामुळे आम्ही सर्व मच्छीमारांना मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच ज्या बोटी मासेमारीसाठी गेल्या आहेत त्यांना परत बोलावत आहोत. आमचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक समुद्रातील आणि किनार्यावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. -अभयसिंह शिंदे इनामदार, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय रायगड