Breaking News

योग्य नियोजनामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन

कर्जत विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुरेश लाड आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत होईल, अशी भाकिते होत होती, परंतु थोरवे यांनी जिद्द आणि योग्य नियोजनाच्या आधारावर ही निवडणूक सहज जिंकली. या मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने एक लाख मते मिळविली नाहीत, मात्र थोरवे यांनी एक लाखापेक्षा जास्त मते मिळवून विक्रमच केला आहे आणि ते ’जायंट किलर’ ठरले. ’आभाळच फाटलंय त्याला ठिगळं कुठे कुठे लावायची’ अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात झाल्याचे निकालावरून स्पष्ट दिसून आले.

मागील निवडणुकीत लाड आणि थोरवे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. त्यामध्ये नवख्या असलेल्या महेंद्र थोरवे यांनी उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी मिळविली आणि सर्व नाराज शिवसैनिकांना बरोबर घेत तब्बल 55 हजारांपेक्षा जास्त मते घेऊन आपली ताकद दाखवून दिली होती. त्या वेळी त्यांचा अवघ्या 1900 मतांनी पराभव झाला होता. त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हनुमंत पिंगळे यांना मोठ्या फरकाने तिसर्‍या क्रमांकावर फेकले. विजयासमीप आलेल्या थोरवे यांनी जिद्द सोडली नाही. पुन्हा शिवबंधन बांधून चार सव्वाचार वर्षे शिवसेनेची बांधणी केली. या कालावधीत माथेरान, कर्जत नगरपालिकेत सत्तांतर करून शिवसेनेचे नगराध्यक्ष बसविले, तसेच नेरळ या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर निर्विवादपणे शिवसेनेचा भगवा फडकवला.

यंदा निवडणूक जाहीर झाली आणि थोरवे यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळवायची या जिद्दीने आपली पावले टाकण्यास सुरुवात केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या थोडे दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड शिवसेनेच्या वाटेवर, अशी वार्ता सर्वत्र पसरली. त्यामुळे थोडे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सुखम दवाखान्यातील सुरेश लाड-सुनील तटकरे भेटीनंतर ते निवळले आणि नाही नाही म्हणत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली. त्यानंतर थोरवे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांना ए, बी फॉर्म मिळाला. त्या वेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी महायुतीतील कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करताना असलेल्या उपस्थित गर्दीने निवडणुकीत ’चमत्कार’ होणार याची कल्पना आली होती.

निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यानंतर लगेचच नाराज असलेल्या हनुमंत पिंगळे यांनी शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. दोनच दिवसांनी शिवबंधनात अडकलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे स्वगृही परतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निर्धार मेळाव्याचे आयोजन करून सुरेश लाड यांना पाठिंबा जाहीर केला. महायुतीचे उमेदवार थोरवे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती आणि शेवटी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष जगदिश गायकवाड यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन केलेली तालुका कार्यकारिणीची बरखास्ती आणि सुरेश लाडांना दिलेला पाठिंबा या सार्‍यांमुळे लाडांचे पारडे जड झाल्यासारखे वाटले. यांसारख्या घटनांमुळे महाआघाडी भक्कम झाल्याचे वातावरण तयार झाल्यासारखे वाटले. ’भाऊ जुना खिलाडी आहे, आयत्या वेळी काही करील,’ अशा वल्गना केल्या, त्यांचेही दात पडले. तसे पाहिले तर त्यांचेही काही चुकले नाही. अनुभवाचे बोल त्यांनी बोलून दाखविले. बेरजेचे राजकारण कागदावरच राहिले. नेत्यांच्या भूमिकेला कार्यकर्ते किंवा मतदारांनी साथ दिली नाही. हे निकालाअंती चांगलेच समजले. निवडणुकीच्या मतदानावेळी बूथवरील परिस्थितीवरूनसुद्धा अनेकांनी अंदाज बांधले, परंतु प्रत्यक्ष मतमोजणीत भलतेच घडले. सर्वांचेच आडाखे चुकले. प्रत्येक मतदान केंद्रावर आघाडी मिळवत थोरवे यांची विजयाकडे होत असलेली घोडदौड लाड रोखू शकले नाहीत.

तब्बल 18 हजार मतांच्या वर मताधिक्य घेऊन महेंद्र थोरवे यांनी विधानसभेत पाऊल ठेवले. यामागे त्यांचे मोठे बंधू माजी उपसभापती मनोहर थोरवे यांचे अथक परिश्रम आहेत. त्यांनी नियोजनाकडे लक्ष दिले. त्यांनी मागील वेळी निसटता पराभव कोणत्या कारणाने झाला याचा अभ्यास करून त्या त्या भागात संपूर्ण लक्ष केंद्रित करून तेथील मते आपल्याकडे कशी येतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला महायुतीतील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली. स्वतः उमेदवार महेंद्र थोरवे यांनी ’अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने निवडणूक रिंगणात उडी घेऊन विजयश्री सहज खेचून आणली आणि मतदारसंघातील विजयाची हॅट्ट्रिक न करू देण्याची परंपरा कायम राखली. या निकालावरून आता राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना आत्मचिंतनाची गरज आहे.

-विजय मांडे, कर्जत

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply