
नागोठणे : प्रतिनिधी
भाजपचे नवनिर्वाचित आमदार रविशेठ पाटील यांचे अभिनंदन करणारा बॅनर शनिवारी (दि. 26) रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फाडला असल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. आमदार रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक व येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फरमान दफेदार यांनी उर्दू हायस्कूलनजिक रविशेठ यांचे अभिनंदन करणारा हा बॅनर लावला होता व त्यावर पाटील यांच्या फोटोसह फरमान दफेदार तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो छापण्यात आले होते, असे दफेदार यांनी सांगितले. माझा कोणावरही संशय नसून नागोठणे पोलीस ठाण्यात तशी रितसर तक्रार केली आहे. असे प्रकार पुन्हा यापुढे घडू नये व यासाठी पोलिसांनी योग्य ते लक्ष घालावे या उदात्त हेतूने ही तक्रार दिली असल्याचे दफेदार यांनी स्पष्ट केले.