Breaking News

माथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळासाठी परवानगी द्यावी

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळास परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मंगळवारी (दि. 7) दिल्ली येथे केली. या संदर्भात मंत्री रेड्डी यांना या वेळी निवेदनही देण्यात आले.
या वेळी चर्चा करताना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मंत्रीमहोदयांना सांगितले की, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले माथेरान गिरीस्थान हे जगातील एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर हा उच्च उंचीचा परिसर सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला आहे. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित हा परिसर उद्योग आणि वाहनमुक्त आहे. तेथील टॉय ट्रेन आणि पर्यावरणपूरक वातावरण हे जगभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे. दरवर्षी जगभरातील सुमारे 10 लाख पर्यटक माथेरान गिरीक्षेत्रात पर्यटनाचा आनंद घेतात. अधिकाधिक पर्यटकांना या क्षेत्राकडे आकर्षित करून पर्यटनवाढीसाठी साहसी खेळ असणे आवश्यक आहे.
साहसी खेळांना आज जगभरात मान्यता मिळाली आहे आणि पर्यटकांमध्ये साहसी खेळांचे विशेष आकर्षण आहे. यामुळे माथेरान गिरीक्षेत्र येथे पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच स्थानिक लोकांचा रोजगारही वाढेल. त्यामुळे माथेरान गिरीस्थानमध्ये पर्यटन, विकास आणि स्थानिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी साहसी खेळास परवानगी देण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply