मुंबई ः प्रतिनिधी
भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बुधवारी (दि. 30) झालेल्या बैठकीत फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड केल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व आमदारांचे आणि नेत्यांचे आभार मानले, तसेच महायुतीचा निवडणुकीत विजय झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचेही आभार मानले. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार स्थापन होईल. पुढची पाच वर्षे राज्याला स्थिर सरकार देणार आहोत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद याच सरकारमध्ये आहे. यामुळेच जनतेने पुन्हा आपल्याला निवडून दिले. राज्यात भक्कम सरकार स्थापन करू, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापनेनंतर राहिलेली कामे पूर्ण करणार आहोत. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेली पाच वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केले. आता पुढची पाच वर्षेही शिवरायांचा सेवक म्हणूनच काम करणार आणि त्यांच्या विचारांचे राज्य असेल, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेनुसार काम करणार, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला 10 आमदारांनी अनुमोदन दिले. त्यानंतर फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. भाजपचे निरीक्षक म्हणून दिल्लीतून आलेले नरेंद्रसिंह तोमर या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper