Breaking News

शेतकर्यांना आधाराची गरज

राज्याच्या निरनिराळ्या भागांत ऐन दिवाळीच्या काळात शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी तरळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणा नव्याने सरकार स्थापनेच्या औपचारिकतेकरिता खोळंबलेली आहे.

दिवाळी हा खरे तर आनंदाचा, चैतन्य जागवणारा सण. महाराष्ट्रात या सणाला अगदी गोरगरिबांच्या दारी सुद्धा मिणमिळती का होईना पणती तेवताना दिसते. पण यंदा दुर्दैवाने राज्याचा शहरी भाग दिवाळीच्या आनंदात असताना ग्रामीण भागातील शेतकरी राजाची दिवाळी मात्र नैराश्याच्या अंधाराने झाकोळून गेली. याच काळात राज्याच्या काही भागांत परतीच्या पावसामुळे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पंचनामे करून मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असले तरी काही ठिकाणी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मात्र आदेश हातात पडण्याच्या प्रतीक्षेत आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका जवळपास राज्यभरातील शेतकर्‍यांना बसल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात भात, नाचणी आणि वरीच्या शेतीचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. क्यार चक्रीवादळामुळे ऐन भातकापणीच्या वेळी पाऊस झाला आणि शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. कोकणातील 40 टक्के भाताचे यामुळे नुकसान झाल्याचेही म्हटले जाते आहे. विदर्भातील शेतकर्‍यांनाही अवकाळी पावसाला तोंड द्यावे लागले. या भागात कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, तीळ, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर इतके मोठे नुकसान झाल्याने विदर्भातील शेतकरी हबकून गेल्याचे दिसते आहे. विदर्भात एकाच दिवसात चार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी समोर आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील दोन तर वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकर्‍याचा समावेश आहे. यातील प्रत्येकाच्या कहाणीतला समान दुवा आहे कर्जाच्या डोंगराचा. त्यामुळेच पुन्हा एकदा शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी होऊ लागली आहे. पीक विम्याच्या अटी शिथील करून शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल अशी तरतूद करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील जनता पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत असून प्रशासकीय यंत्रणेने त्याकरिता तातडीने हालचाली करण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे काही भागांत शेतांत पाणी साठल्याने मुक्या प्राण्यांना सुद्धा चार्‍याअभावी रहावे लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चारा छावण्यांची गरज निर्माण झाली आहे. अहमदनगर आणि पारनेर तालुक्यांत दसरा, दिवाळीवर लक्ष ठेवून झेंडूची शेती केली जाते. परंतु नेमकी विकण्यासाठी फुले तयार असताना परतीच्या पावसाने या भागाला झोडपून काढले. अनेक ठिकांणी बागांमध्ये पाणी साचल्याने फुले सडली तर काढून ठेवलेली फुलेही काळपट पडली. शहरी भागांत दिवाळीच्या दिवसांत वीस रुपये पाव किलो दराने फुले विकली गेली असली तरी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना मात्र किलोमागे अवघा 1 रुपयाचा दर मिळाला. यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी बाजार समित्यांच्या रस्त्यांवर फुले फेकून दिली. मावळ परिसरातही भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वेगाने सरकार स्थापना होऊन नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळू शकेल.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply