पनवेल : प्रतिनिधी
पनवेल रेल्वे स्टेशनवर नवीन पनवेलकडे जाणारा जिना अरुंद असल्याने मोठा जिना बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. हा जिना बांधताना कोणताही विचार न करता तो प्रवाशांना अडचणीचा आणि अपघाताला आमंत्रण देणारा ठरणार असल्याने तातडीने ते काम थांबवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 ते 4 वरून रोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणा आणि अंधेरी अशा 333 लोकलच्या फेर्या होतात. याशिवाय फलाट 5 ते 7 वरून मेल व एक्स्प्रेसच्या नियमित 57 आणि तीन हॉलिडे एक्स्प्रेस गाड्या जातात. रोज लाखो प्रवासी ये-जा करीत असलेल्या या स्टेशनवर प्रवाशांना अनेक गैरसोईना तोंड द्यावे लागते. पनवेलहून सकाळी कामावर ठाण्याला जाणार्यांची संख्या मोठी आहे. पनवेलच्या पूर्वेला म्हणजेच नवीन पनवेल बाजूला मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती वाढली आहे. या बाजूला येताना फलाट पाचवरील जिन्याने वर जावे लागते. फलाट पाचवर असलेला जिना अत्यंत अरुंद आहे. सकाळी, संध्याकाळी आणि मेल गाडी आल्यावर लोकलच्या प्रवाशांची वरती जाण्यासाठी होणारी गर्दी ही अपघातला निमंत्रण देणारी आहे.
पनवेल रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक चारवर स्वच्छतागृह आणि नवीन जिना बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर जिन्यावर जाण्याचा मार्ग हा पूर्वीच्या जुन्या जिन्याच्या सुरुवातीच्या अरुंद भागातून ठेवण्यात येत आहे. याच ठिकाणी फलाट क्रमांक पाचवर येणार्या लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवासीही लोकल गाड्यांच्या फलाटावर येतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या नवीन जिन्याचे काम थांबवून त्याचा वर जाण्याचा मार्ग बदलावा, अशी मागणी करण्यात येत आहे.