Breaking News

जिल्ह्यात भातशेतीचे 27 टक्के नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी

परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत 17 टक्के भातशेतीचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे 10 टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे 27 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरी 1 लाख 23 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागडवड करण्यात येते. यंदा 95 हेक्टरवर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत 16 हजार 395 हेक्टर  क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे 17 टक्के क्षेत्रात भातशेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीतून वाचलेले पीक चांगले होते, परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसात तेदेखील गेले. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात अंदाजे  10 हजार हेक्टर क्षेत्रावर कापलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी तसेच ऑक्टोबर महिन्यातील परतीचा पाऊस यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 27 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्यात भाताच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे. परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी हा पाऊस रब्बी हंगामातील शेतीसाठी लाभदायक ठरणार आहे. जमिनीत ओलावा राहिल्यामुळे वाल व इतर कडधान्याचे उत्पादन चांगले होईल. पांढर्‍या कांद्यासाठीदेखील हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. दरम्यान, रब्बी हंगामात कडधान्य लागवडीसाठी महाड आणि अलिबाग विभागासाठी प्रत्येकी 11 हजार किलो कडधान्य बियाणे शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली.

परतीच्या पावसाने झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे  सुरू करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार नुकसानभरपाई मिळेल.

 -पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिकारी, रायगड

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply