
अलिबाग : प्रतिनिधी
क्यार आणि महावादळाने आलेल्या पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे या दोन वादळांमुळे मच्छीमार बांधवांचेदेखील आर्थिक नुकसान झाले आहे. मच्छीमार सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा पाऊस लांबल्यामुळे मासेमारी बंदीचा कालावधी उलटल्यानंतरही मच्छीमारांना मासेमारी करता आली नाही. किनार्यांवर नांगरून ठेवलेल्या बोटी उशिरा समुद्रात सोडल्या. त्यानंतर क्यार वादळ आले. त्यापाठोपाठ महावादळ आले. या वादळांमुळे मासेमारी करण्यासाठी बोटी समुद्रात जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मच्छीमार बांधवांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. रायगड जिल्ह्याला 240 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. जिल्ह्यात 4484 नोंदणीकृत बोटी आहेत. 45 ठिकाणी मासळी उतरवली जाते. जिल्ह्यात मत्स्य व्यवसायातून करोडो रुपयांची उलाढाल होते, मात्र मागील काही दिवसांमध्ये वातवरणात वारंवार बदल होत असल्यामुळे मोठी मासळी मिळेनाशी झाली आहे. तसेच वादळामुळे बोटी समुद्रात जाऊ शकल्या नाहीत. अलिबाग तालुक्यातील रेवस-बोडणी परिसरात सुमारे 300 मासेमारी बोटी आहेत. तसेच 50 ते 60 लहान-मोठ्या होड्या आहेत. त्यादेखील किनार्यांवर आहेत. बदलत्या हवामानामुळे मासेमारी व्यवसायावर मोठे संकट उभे राहिले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने मासळीचा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून केली जात आहे.