Breaking News

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, अधूनमधून कमी-जास्त होणार्‍या विजेच्या दाबामुळे घरगुती उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे नागरिकांना व कारखाना व्यवस्थापकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याविरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीची कामे न केल्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर दररोज वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. परतीचा पाऊस सुरू झाल्यापासून तर अनेक तास वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरू आहे. दरम्यान, कमी-जास्त विजेच्या दाबामुळे घरातील फ्रीझ, टीव्ही, पंखे, बल्ब यांसारख्या अनेक उपकरणांत बिघाड होत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी वीज वितरण कंपनी कार्यालयात गेलेल्या ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने वीज ग्राहक हतबल झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कारखान्यातील उत्पादन वेळेत पूर्ण होत नसल्याने व्यवस्थापनाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या खोपोली विभागात पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे असलेल्या कर्मचार्‍यांना रात्रंदिवस काम करावे लागत आहे. परिणामी त्यांना अनेक आजारांनाही सामोरे जावे लागत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, वेळोवेळी कमी-जास्त दाबाने होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे  नेहमीच्या वापराची घरगुती उपकरणे बंद पडत आहेत. याचा भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्राहक मंच आंदोलन छेडेल.

-नितीन पाटील, सचिव, जनजागृती ग्राहक मंच, रायगड जिल्हा

वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे  वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. याबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्यास त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात.

-किरण हाडप, वीज ग्राहक, खालापूर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply