यावर्षी अरबी समुद्रात आतापर्यंत चार चक्रीवादळे जन्माला आली आहेत. त्यातच एक चक्रीवादळ ओसरण्याआधी त्याच्या अवशेषांतून दुसरे मोठे चक्रीवादळ निर्माण होण्याची विरळा घटना 1965 नंतर प्रथमच अरबी समुद्रात यंदा पहायला मिळाली. अचानकपणे अरबी समुद्रातील चक्रीवादळांची वाढलेली संख्या आणि अधिक तीव्र स्वरुपाची दोन-दोन चक्रीवादळे निर्माण होणे हा जागतिक तापमानवाढीचाच भाग असल्याचे मत संबंधित तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. एकंदरच हे सारे जागतिक हवामान बदलाचा भाग असावे.
गेल्या आठ दिवसांत सातत्याने वृत्तपत्रांमधील रकाने नैसर्गिक आपत्ती व संबंधित घटनांनीच व्यापले आहेत. परतीच्या पावसाने झोडपल्यानंतर त्यातून झालेल्या नुकसानीची चर्चा ओसरण्याआधीच क्यार चक्रीवादळाचा फटका अरबी
समुद्रानजीकच्या भागाला बसला. विशेषत: कोकण किनारपट्टीवरच्या भातशेतीचे या चक्रीवादळाच्या प्रभावातून झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले. त्याच सुमारास मराठवाडा व विदर्भासही अवकाळी पावसाने झोडपून काढले. राज्यातील शेतकरी या लागोपाठच्या नैसर्गिक आपत्तींनी हवालदिल झालेला आहे. त्यात अरबी समुद्रात क्यार चक्रीवादळ पूर्णत: ओसरण्याआधीच महा चक्रीवादळ घोंघावू लागले. 1965 नंतर प्रथमच अरबी समुद्रात अशातर्हेने एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली आहेत. या दुसर्या चक्रीवादळाचा मोठा फटका गुजरातला बसण्याची शक्यता असली तरी महाराष्ट्राच्या उत्तर भागातही त्यामुळे 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे अवघ्या आठवडाभरात पुन्हा महाराष्ट्राला मुसळधार पावसाला तोंड द्यावे लागणार आहे. खरे तर आजवर बंगालच्या उपसागरातच चक्रीवादळे सातत्याने निर्माण होताना दिसली आहेत. 2007 सालच्या गोनू चक्रीवादळानंतर अरबी समुद्रात जन्माला आलेले मोठे चक्रीवादळ म्हणून क्यारचाच उल्लेख करावा लागेल. परंतु 2019 मध्ये मात्र अरबी समुद्रातील परिस्थितीत बराच बदल दिसतो आहे. गेल्या आठवड्यातच एका अहवालात, अवघ्या 30 वर्षांत मुंबई शहराचा बहुतांश भाग पूर्णत: पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. न्यूयॉर्कस्थित ‘क्लायमेट सेंट्रल’ या संस्थेच्या या अहवालात जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका बसणार्या देशांमध्ये भारतास तिसर्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले असून कोलकाता आणि चेन्नई ही शहरे देखील समुद्राच्या पाण्याखाली गाडली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे हे चक्रीवादळ ओमानवर जाऊन आदळले नाही. तर त्याच्या विखुरलेल्या अवशेषांतून 31 ऑक्टोबरपर्यंत महाचक्रीवादळाची निर्मिती झाली. प्रारंभी पश्चिमेला व वायव्येला सरकत राहिलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून 5 नोव्हेंबरला ते यु टर्न घेऊन दक्षिण गुजरात व उत्तर महाराष्ट्राकडे सरकू लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही भीती खरी ठरल्यास गुजरातच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांसह महाराष्ट्रात नंदूरबार, नाशिक, जळगाव, धुळे, पालघर, मुंबई आणि बहुदा पुण्यापर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आठवडाभरात दुसर्यांदा महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे पाऊस कोसळण्याची भीती आहे. देव करो आणि हा अंदाज खोटा ठरो. आधीच ओल्या दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता आणखी नैसर्गिक आपत्तींचा मारा सोसवणार नाही.