Friday , September 22 2023

इर्शाळवाडी ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्यावश्यक दाखल्यांचे वाटप

अलिबाग ः प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून पावसाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. या सर्व कुटुंबाना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार (दि. 22)पासून तात्पुरते निवारा केंद्र येथे शिबिर लावण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाच पाढे व वस्त्यातील नानिवली नम्रतावादी हे एक छोटस गाव यापासून इर्शाळगडाच्या डोंगरावर साधारण एक ते सव्वा तासाच्या अंतरावर असलेल्या आदिवासी पाड्यावर 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली आणि 48 पैकी जवळपास 39 कुटुंब व त्यांची घरे कोसळलेल्या दरडीतील मातीच्या ढिगार्‍याखाली सापडले. त्यांच्या अस्तित्वाचा शासकीय पुरावाच नष्ट झाले. केवळ त्यांचे नाव हीच त्यांची ओळख शिल्लक राहिली होती. या सर्व नागरिकांना स्वतंत्र शासकीय ओळख देण्याचा व त्यासाठी तातडीने अत्यावश्यक दाखले वितरण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला. त्यानुसार सर्व जिल्हा स्तरीय यंत्रणा कामाला लागली. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी संबंधित तालुक्यातील अधिकारी यांची या कामासाठी नेमणूक केली.
दिवसभरात विविध प्रकारचे कागदपत्रे व संजय गांधी योजनेतंर्गत अनाथ 16, विधवा पाच, श्रावणबाळ एक असे लाभ संबंधितांना देण्यात आले. त्याचप्रमाणे 42 व्यक्तींना रेशन कार्ड व 57 जणांना आधार कार्डचे वाटप करण्यात आले. याबरोबरच 41 कुटुंबाना सानुग्रह अनुदानाचेदेखील वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबास पाच हजार याप्रमाणे दोन लाख 15 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले तसेच जीवनावश्यक वस्तूंचेदेखील वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन आपल्या पाठीशी खंबीर असल्याची जाणीव या ग्रामस्थांना झाली आहे.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply