Breaking News

साहित्यातील झंझावात…गिरीजा कीर

ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे वयाच्या 86व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले.

काही वर्षांपासूनचा गिरीजाताईंचा आणि माझा सहवास. त्या सहवासात घालवलेले अनेक क्षण. त्यांचे अंत्यदर्शन घेताना मनात उठलेले आठवणींचे वादळ, कसं व्यक्त व्हावं तेच समजत नाही. गिरीजाताईंचे व्यक्तिमत्त्वच इतकं अफाट होतं की ते शब्दांच्या चिमटीत पकडता येणार नाही, परंतु काही आठवणी व त्यांचे विचार आपल्यासमोर मांडते.  मी एक वाक्य बर्‍याच वेळा ऐकल,ं वाचलं होतं, ते म्हणजे चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं सहवासाशिवाय कळत नाहीत. या वाक्याचा प्रत्यक्ष अनुभव आला तो गिरिजा कीर यांना भेटल्यानंतर. त्यांच्याविषयी मनात आदरयुक्त भीती होती, ती म्हणजे त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणातून आणि कणखर आवाजातून आलेली. काही वेळा दूरध्वनीवरून आमचे बोलणे झाले होते. त्या संवादातून माझा आणि त्यांचा परिचय झाला. त्यामुळे त्यांच्या आणखी जवळ जाण्याची उत्सुकता वाढली. कारण मला अशी शिस्तप्रिय माणसं मनापासून आवडतात. ज्येष्ठ साहित्यिका, थोर समाजसेविका म्हणून त्यांच्या काही वाचलेल्या पुस्तकांतून पुरेसा परिचय होता, परंतु त्यांच्यातील आई मला भेटली ती त्यांच्याजवळ गेल्यानंतरच. मनाच्या गाभार्‍यात जपावी वाटणारी माणसं माझ्या आयुष्यात आली, त्यापैकी एक नाव म्हणजे आदरणीय गिरिजा कीर.

5 फेब्रुवारी 1933मध्ये धारवाड येथे  ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्या  मूळच्या कोल्हापूरच्या. लहानपणीच आई गेल्यामुळे  पितृछायेत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच्या घरात कडक शिस्तीची विधवा आत्या होती. त्यामुळे लहानपणीच मनाला शिस्त लागली. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केलं. मुरूड-जंजिरा येथे असताना त्यांनी  पहिली कविता लिहिली. तेथील  निसर्ग  त्यांच्या सृजनशील मनाला लेखनासाठी प्रवृत्त करीत होता. गिरिजाबाई मनातले विचार कागदावर मांडू लागल्या.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्या मुंबईला आल्या. कॉलेजला असताना  वक्तृत्व स्पर्धेत  भाग घेऊ लागल्या. नाटकाची आवड होती. त्यामुळे कला साहित्यात त्या मनापासून रमल्या. बीए पास झाल्यानंतर उमाकांत कीर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. घरात सासूबाई जुन्या आणि पारंपरिक विचारांच्या. त्यामुळे गिरीजाबाईंतील लेखिका त्यांच्या कल्पनेत बसणारी नव्हती. गिरीजाताईच एकदा म्हणाल्या, मी त्यांच्या विचारांच्या चौकटीत सून म्हणून बसत नव्हते. कारण मी गरीब घरातून आले होते. सासूबाई एक दिवस माझ्या नवर्‍याला म्हणाल्या, पायातील वाहन पायातच बरी. नाकापेक्षा मोती जड नको. त्या चौकटीबाहेर येऊ शकत नव्हत्या आणि मी माझे विचार बदलू शकत नव्हते. मांसाहार करू शकत नव्हते. वही-पेन त्यागू शकत नव्हते. नटणे, मुरडणे माझ्या स्वभावात बसत नव्हते. त्यामुळे मी सून म्हणून अपयशी ठरले. 10 वर्षे मुकी-बहिरी होऊन राहिले.

त्यांच्या या संवादातून बरंच काही समजून जातं. बराच वेळ गिरिजाताईंच्या भूतकाळाशी आम्ही दोघीही एकरूप झालो होतो. पावसाच्या सरींसारख्या मनाच्या आभाळातून त्या आठवणी झरझर बाहेर येत होत्या.

एक दिवस गिरीजाताईंची बहीण त्यांना भेटायला आली आणि तिने घरातील सर्व परिस्थिती पाहिली. ती गिरीजाताईंना म्हणाली, तुझ्यातील तडफदारपणा, तुझं लेखन, तुझं वक्तृत्व हे सगळं कुठे गेलं? मरशील इथं. बाहेर पड. तिच्या बोलण्याने गिरिजाताई अस्वस्थ झाल्या आणि अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडल्या. भावावर बोझ नको म्हणून छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या. त्या काळात वडील पाठीशी खंबीर उभे राहिले. त्या परत लिहू लागल्या आणि तेव्हापासून तो लिखाणाचा खळखळाट अखंड सुरूच राहिला, तो शेवटच्या काही दिवसांपर्यंत. या वर्षीच्या 16 दिवाळी अंकांत गिरीजाताईंनी लेखन केलं. आपल्या लेखणीतून वास्तवातील दाहकता मांडत वाचकांच्या मनावर अधिराज्य केलं. सामाजिक जाणिवा समृद्ध करीत लहान मुलांनाही पुस्तकाची ओढ लावणार्‍या ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांची लेखणी साहित्याच्या अनेक प्रकारांत लीलया सरसावत होती. कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवास वर्णने व बालसाहित्य अशा वैविध्यपूर्ण मराठी साहित्यक्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान मिळविले. त्यांची 100पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक कथाकथनाचे कार्यक्रम भारतातच नव्हे, तर विदेशातही त्यांनी केले. त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम अतिशय गाजले.

जीवनाच्या वाटेवरचे अनेक खाचखळगे पार करत माणसातलं माणूसपण शोधत त्या अखंड चालत राहिल्या. लिखाणाच्या माध्यमाद्वारे त्यांनी विचारांना प्रवाहित केलं. कथाकथनातून रसिकांच्या मनाला भुरळ पाडली.  या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला गिरिजा कीर भावल्या त्या आईच्या भूमिकेत. त्यांची तीन पुस्तके मी प्रकाशित केली आणि चौथे पुस्तक लगेच प्रकाशित होत आहे. यादरम्यान झालेल्या गाठीभेटीमध्ये त्यांच्या मायेच्या स्पर्शाने मन ओलावलं. लेखिका आणि प्रकाशिका यापलीकडे जाऊन आमचं नातं एका वेगळ्या वळणावर बहरलं.

गिरिजा कीर यांनी सतत 16 वर्षे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पाचं काम केलं. एकदा त्या कुष्ठरोगी आश्रमात अमरावती येथे तपोवनात गेल्या होत्या. तिथे त्यांना स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे भेटले. त्या भेटीत ते गिरिजाताईंना म्हणाले, गिरिजाबाई, तुमच्यासारख्या प्रतिभावंतांनी बंद दारे ठोठावली पाहिजे. यावर गिरिजाताई म्हणाल्या, त्या व्यक्तीचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यानंतर मी झपाटल्यासारखी कामाला लागले. कोतवालवाडी आदिवासी भागात 1991पासून काम सुरू केलं ते अखंड 16 वर्षे.

पाय जमिनीवरून ठेवून आकाश कवेत घेणार्‍या गिरिजाबाई. त्यांना अनेक मानसन्मानांनी  गौरविण्यात आले. 51 पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्यापैकी चार महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अन्य प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना बहाल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क यांच्यातर्फे ’कथा सम्राज्ञी’ हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला आहे. गिरिजा कीर यांनी अनेक वेळा कामगार स्त्रियांच्या वस्तीत जाऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला. उन्मार्गी स्त्रिया व मुलांच्या संदर्भातील अनेक समस्या त्यांनी व्यवस्थित समजावून घेतल्या. आदिवासी मुलांवर ’राखेतली पाखरं’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. आदिवासी कामगार, कनिष्ठ व मध्यमवर्गीय स्त्रिया व मुले यांच्या जीवनाचा अभ्यास व मुलाखाती यावर लेखन केले.  ’इथं दिवा लावायला हवा’ हे पुस्तक पुढे प्रकाशित झालं. अमरावतीच्या कुष्ठरोगी आश्रमात जाऊन त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम घेतले. कोतवालवाडी नेरळ येथे आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रकल्पात 16 वर्षे काम केलं. 1999 ते 2010मध्ये जन्मठेपेच्या गुन्हेगारांना तुरुंगात जाऊन प्रत्यक्ष भेटून हृदयपरिवर्तनाचे काम त्यांनी केले. त्यावर लेखन केलं. त्याचं ’जन्मठेप’ हे पुस्तक प्रकाशित झालं. साहित्य अकादमी मुंबई चर्चासत्रात स्त्रियांची आत्मचरित्रे यावर अध्यक्षीय भाषण त्यांनी केलं. आकाशवाणीच्या सर्व विभागांतून सहभाग, दूरदर्शन, सह्याद्री व इतर वाहिन्यांवर मुलाखती चर्चासत्रात सातत्याने त्यांचा सहभाग होता. कथाकथन मालिका प्रसारित झाली. कन्नड, हिंदी, गुजराती, अहिराणी या भाषांमध्ये  त्यांनी साहित्य प्रसिद्ध केले. त्यांच्या ‘आभाळमाया’ कादंबरीचा इंग्रजी अनुवाद झाला. ‘अनिकेत’ ही कादंबरी खूप गाजली. कैद्यांच्या जीवनावरील गेल्या वर्षी प्रकाशित झालेलं ’कुणा नामदेवाची चित्तरकथा’ ही कायद्याच्या जीवनावरील कादंबरी, तसेच ’क्षण क्षण कण कण’ व छोट्या मुलांसाठी ’चला उठा जागे व्हा’ आणि आता प्रकाशनाच्या मार्गावर असलेलं ’गिरीजा सुजन’ ही अलीकडच्या काळातील पुस्तके भरारी प्रकाशनने प्रकाशित केली.

गिरिजा कीर यांचे कथासंग्रह -गिरिजाघर, देवखुणा, गिरकी, राखीतली पाखरं, सारंग तुरा, नक्षी, रंगत, चांदण्यांचे झाड, चित्रलिपी, चक्र वेद, आभाळमाया, आभाळ भरून आले अशा एकूण 16 दिवाळी अंकांत त्यांनी लेखन केलं. शेवटपर्यंत त्या लिहितच राहिल्या. गिरिजा कीर यांचे उदात्त विचार त्यांच्या साहित्यातून

सदैव मनामनात रूजत राहतील यात शंकाच नाही.

 – लता गुठे (मो. 9870617124)

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply