Breaking News

भातशेती, आंबा पर्यटन धोक्यात

हिवाळा सुरू झाला तरी पावसाचा जाण्याचा काही पत्ता नाही. हिवाळ्यात कोकणात पर्यटन वाढते, पण पावसामुळे अजूनही पर्यटन हंगाम कोरडाच आहे. पावसामुळे कोकणातील पर्यटनावर मोठा परिणाम होत आहे. पर्यटकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

मुरूड तालुक्यात एकंदर पाऊस आजतागायत 4500 मिलीमीटर पडूनसुद्धा खराब हवामानामुळे तालुक्यात मागील तीन दिवसांसून पाऊस  पडत असल्याने पर्यटन व मासळी व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होऊन सर्व उद्योग व्यवसायावर याचा गंभीर परिणाम होत आहे.

पाऊस लवकरच गेला नाही आणि हिवाळा सुरू झाला नाही, तर याचा परिणाम कोकणातील आंबा पिकावरही होण्याची दाट शक्यता आहे. आंबा पीक या लांबलेल्या पावसामुळे धोक्यात येईल. भातशेतीचे लांबलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.  पर्यटनावर पावसाचा मोठा परिणाम झाला. सुप्रसिध्द जंजिरा किल्ला येथेही दिवाळीची सुटी असतानादेखील पर्यटक दिसून आले नाहीत, तर मुरूड शहरातील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटक नसल्याने घोडागाडी, हातगाडीवाले, इतर खेळणीवाले यांचा व्यवसाय मंदावल्याचे दिसते.

हवामान बदलल्यामुळे जंजिरा किल्ल्यावरील जलप्रवास बंद करावा लागत आहे, तर वादळी हवामानात खोल समुद्रात गेलेल्या होड्या पुन्हा किनार्‍याला येत आहेत. मासळी मिळत नाही. त्यामुळे मासेविक्रीचा धंदा मंदावला असून हातात पैसे नसल्याने किराणा माल खरेदी व कपडे खरेदी अशा दुकानांत ग्राहक नसल्याने मोठा आर्थिक फटका दुकानदारांना सहन करावा लागत आहे.

पर्यटक नसल्याने सर्वच धंद्यांवर याचा मोठा गंभीर परिणाम झाला असून सर्वच धंदे मंदावले आहेत. जंजिरा किल्ल्यावर पर्यटक नसल्याने शिडाच्या बोटींचा धंदासुद्धा मंदावला आहे. परिणामी स्थानिक ग्रामस्थसुद्धा बेजार झाले आहेत. दिवसा ऊन तर सायंकाळी चारनंतर वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू होतो. असे अनेक दिवस सुरू असल्याने मुरूडसह कोकणातील सर्वच ठिकाणी पर्यटकांची वानवा दिसून येत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत मुरूड व काशीद या दोन ठिकाणी पर्यटक नसल्याने लाखो रुपयांचे हॉटेल व लॉजिंग व्यवसायाचे नुकसान झाले आहे.

क्यार वादळामुळे मच्छीमारीवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक बोटी किनार्‍यावर आहेत. एकंदरीत वातावरणातील बदलामुळे कोकणातील आर्थिक नाडीच आवळल्याचे दिसून येत आहे.

 समुद्रकिनार्‍यावरील घोडागाडी व्यवसायालासुद्धा ग्राहक नाहीत. त्यामुळे घोडे सांभाळण्याचा खर्चसुद्धा मालकांना करावा लागत आहे. एकंदर सर्वच ठिकाणी पर्यटक नसल्याने मंदीचे सावट दिसत आहे.

ऐन दिवाळी हंगामात पावसाच्या या तडाख्यामुळे स्थानिक शेतकरीसुद्धा हवालदिल झाले आहेत. शेतात आलेले उभे पीक पावसाच्या पाण्यामुळे भिजून शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचप्रमाणे मुरूड शहरातील हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांचे सतत पडणार्‍या पावसामुळे पर्यटकसंख्या रोडावल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. नुकतीच विधानसभा निवडणूक संपली असतानादेखील शासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामातून मुक्त झाले असले तरी त्यांनी फिरण्याकडे दुर्लक्ष केल्याने पर्यटकसंख्या रोडावल्याचे निदर्शनास येते. अचानकपणे हवामानात झालेल्या बदलामुळे कोकणातील सर्वच भागांत पावसाने थैमान घातल्याने पर्यटक बाहेर फिरण्यास न निघाल्यामुळे बदलत्या हवामानाचा परिणाम पर्यटन व्यवसायाला सहन करावा लागत आहे. दिवाळी सुटीमध्ये सर्व जण बाहेर फिरावयास जातात, परंतु कोकणातील सर्वच जिल्ह्यात पाऊस असल्याने पर्यटक बाहेर पडत नाहीत. यामुळे मुरूडसारख्या असंख्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. सुटीचा हंगाम असतानादेखील पर्यटक येत नसल्याने पर्यटकांवर असणारे सर्व धंदे ओस पडल्याचे पाहावयास मिळत आहे.

 -संजय करडे, मुरूड

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply